एकदा एक

गोष्ट पहिली
एकदा एक मनुष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतो. रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठी झाडे असतात. दुसऱ्या बाजूला भाज्यांचे मळे असतात. वाटेंत दुपार होते. म्हणून तो एका झाडाखाली थांबतो, बरोबर आणलेली शिदोरी सोडून जेवण घेतो आणि झाडाच्या बुंध्याला टेकून आराम करू लागतो. त्याचं लक्ष समोरच्या मळ्याकडे जातं. त्यांत वेलींना भोपळे लागलेले असतात. तो वर बघतो तर झाडाला आंबे लागलेले असतात. त्याच्या मनांत येतं, ‘वेलीला उभं राहायलाही आधार लागतो तर तिला केवढं मोठं फळ आणि एवढ्या मोठ्या झाडाला मात्र लहान फळ! परमेश्वराला अक्कल जरा कमी असली पाहिजे’. त्याला पेंग येऊ लागते म्हणून तो जरा आडवा होतो. इतक्यांत वरून एक कैरी त्याच्या डोक्यावर पडते. त्याला थोडी दुखापत होते. पण परमेश्वराच्या शहाणपणाबद्दल त्याची खात्री पटते. 

गोष्ट दुसरी
एका गावांत एक आंधळा रहात असतो. तो त्या गावांतील दूध दुसऱ्या गावी पोचवायचे काम करून पोट भरत असतो. त्याचा जायचा यायचा रस्ता जंगलांतून असतो. लोकांना सकाळी लवकर दूध मिळावं म्हणून तो मध्यरात्रीच डोक्यावर दुधानी भरलेला हंडा व हातांत पेटता कंदील घेऊन आपल्या गावाहून निघत असतो. आंधळा असूनही रस्ता नेहमींचा पायाखालचा असल्यामुळे त्याला काही अडचण येत नाही.
असाच एका मध्यरात्री जात असतांना जंगलांतल्या रस्त्यावर त्याची समोरून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते. समोरचा माणूस रागावतो आणि त्याला म्हणतो, “काय रे दिसत नाही का? डोळे फुटले की काय तुझे?” त्यावर आंधळा प्रथम समोरच्याची क्षमा मागतो आणि नंतर आपण खरोखरच आंधळे असल्याचे सांगतो. समोरच्याला अपराधी वाटतं. तो आंधळ्याची चौकशी करतो. आंधळा त्याला आपल्याबद्दल सांगतो. त्याची हकीकत ऐकून समोरचा त्याची क्षमा मागून जायला निघतो. इतक्यांत त्याचे लक्ष आंधळ्याच्या हातांतल्या पेटत्या कंदिलाकडे जाते. तो आंधळ्याला विचारतो, “तुला तर दिसत नाही. मग हा कंदील कशाला बरोबर घेतोस?” त्यावर आंधळा उत्तरतो, “मी रात्रीची ये-जा करतो. समोरच्या माणसांना मी दिसायला पाहिजे ना!”   

~ by manatala on जुलै 31, 2007.

यावर आपले मत नोंदवा