शरीर आणि मन

 शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींचे योग्य संतुलन यशस्वी मानवी जीवनाला आवश्यक आहे. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् असे म्हटले आहे. धर्माचरण करण्यासाठी मानसिक इच्छा आणि तयारी यांची गरज असतेच ; पण प्रकृती बरोबर नसेल तर देवाची साधी पूजा तरी हातून कशी घडणार ? शिवाय धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतला तरी मानवी कर्तव्य पार पाडण्यासाठी शरीर सुदृढ आणि सक्षम असणे आवश्यक आहे.

सशक्त शरीरातच सक्षम मन राहाते या वचनाचा आधार घेतला तर मनाचा आणि शरीराचा संबंध आपल्याला सहज समजून येतो. आपली संस्कृती , धर्मपरंपरा चंदाला मनाचा कारक मानतात आणि सूर्याला आरोग्यदाता समजतात. सूर्य हा शरीर सुदृढ ठेवतो आणि चंद मन आनंदी आणि प्रसन्न राखतो ही श्ाद्धा प्राचीन काळापासून आपण बाळगीत आलो आहोत. सूर्य आणि चंद यांचा हा संबंध अनेक शास्त्रांत , अनेक विषयांत प्रतिबिंबित झालेला आहे.

योगशास्त्रातील हठयोगातसुद्धा म्हणजे सूर्य आणि म्हणजे चंद असे मानले जाते. म्हणजे उजव्या नाकपुडीतून घेतला जाणारा श्वास आणि म्हणजे डाव्या नाकपुडीतून घेतला जाणारा श्वास असाही अर्थ आहे. सूर्यनाडी आणि चंदनाडी असेही या दोन नाड्यांना उद्देशून म्हटले गेले आहे. सूर्य आणि चंद हे दोन्ही ग्रह आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रतिबिंबित झालेले दिसतात आणि म्हणूनच शरीर आणि मन यांचे एकत्रपणे चालणे हे सूर्य , चंदाच्या नियमांत आणि समबुद्धीने चालण्याच्या रीतीला अनुरूप असे असते.

मनुष्याचा जीवनप्रवास हा विविध विकार आणि भावभावना यांच्या सोबतीने चालत असतो. तारुण्य काळात मनावर अंकुश ठेवणे आवश्यक असते. मन सुदृढ राखावे लागते. मन इकडे-तिकडे भरकटू नये म्हणून जागरूकता ठेवावी लागते. म्हातारपणात शरीर आपल्या ताब्यात राहात नाही. डावा पाय उचलावा असे मनात आले आणि आपल्या मेंदूकडून त्या पायाच्या संबंधित मज्जातंतूला तशी सूचना केली गेली तरी तो पाय उचलला जाईलच याची शाश्वती नसते. तरुणपणात अशी शाश्वती असते ; पण म्हातारपणी शरीर दुबळे झाल्यामुळे ते मनाच्या अंकित राहात नाही.

अनेक वृद्धांच्या विषयात शरीर थकलेले दिसत असले , तरी मन तरुण आणि टवटवीत असलेले आपण पाहतो. वृद्धाच्या मनाला तारुण्याची उभारी नसली तरी वेगवेगळा विषय जाणून घेण्याची उत्सुकता राहू शकते. पण अमूक गोष्ट आपल्याला झेपणार नाही ही शारीरिक अक्षमता मनाला मागे खेचत असते. जीवनातील आनंद उपभोगण्यासाठी शरीर आणि मन यांचा एकमताने समतोल साधला गेला तर ते खरे आयुष्य. अन्यथा यातले एक जरी दुबळे झाले तरी माणसाचे आयुष्यच झाकळून जाते.

ज्याला जीवन व्यवस्थित प्रकाराने व्यतीत करावयाचे असेल त्याला शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे योग्य लक्ष पुरविणे आवश्यक असते. शरीराची निगा राखण्यासाठी आहार , योग्य तो व्यायाम , कष्ट आणि त्याबरोबर स्नानासारख्या दैनंदिन कार्यक्रमातून शरीराची स्वच्छता इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. पण मनाची निगा कशी राखणार ? मन पाऱ्यासारखे चंचल आणि ओढाळ आहे. पाणी जसे उंचावरून खाली धाव घेते तसेच मनाचे आहे.

मनाला प्रलोभने हजार , त्यातल्या कुठल्या प्रलोभनाच्या नादी ते लागेल आणि त्याच्या मागे धावेल ते सांगता येणार नाही. मनावर चांगले संस्कार झाले , मन विचारी असले , किंबहुना त्याला विचार करण्याची सवय लागली तर आपोआपच ते योग्य मार्गावर राहते आणि मनावर चांगले संस्कार घडण्यासाठी चांगल्या विषयाचे वाचन , चिंतन , मनन आवश्यक असते. संस्काराने माणूस शहाणा होतो. त्याला बरे काय आणि वाईट काय यामधला फरक कळतो. म्हणून नव्या पिढीवर चांगले संस्कार कसे होतील ते पाहणे आवश्यक आहे.

सध्याचे जग हे उद्योजक आणि व्यापारी यांचे जग आहे. या वर्गापैकी बहुसंख्य लोक इतरांकडे आपले गिऱ्हाईक म्हणून पाहतात. लोक गैरमार्गाला लागतील , लोकांच्या भावना बोथट होतील असे वर्तन त्यांच्याकडून सहजगत्या घडते , ते टाळले गेले पाहिजे. प्रत्येक समाजाचे एक बलस्थान असते. त्या बलस्थानाची ओळख आणि त्याचा अभ्यास नव्या पिढीला कसा होईल ते पाहणे ही समाजधुरिणांची जबाबदारी आहे. ती त्यांनी पाळली नाही तर उद्याची पिढी घडविण्याच्या बाबतीत तेच कमी पडले असे म्हणावे लागेल.

~ by manatala on जुलै 27, 2007.

यावर आपले मत नोंदवा