Esakal Article

•जानेवारी 10, 2010 • टिपणी करा

आत्ताचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ – सचिन तेंडुलकर वृत्तसंस्था Sunday, December 06, 2009 AT 04:08 AM (IST) Tags: cricket, sports, india, srilanka, sachin tendulkar मुंबई – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली असून, आत्ताचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे. असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. भारताने श्रीलंकेवर एक डाव व 24 धावांनी विजय मिळवल्यानंतर आत्ताचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे का असे विचारले असता सचिनने हो म्हणून सांगितले. तसेच भारतीय संघाची फलंदाजी मजबूत असल्याचेही तो बोलला. भारतीय संघाने गेल्या 18 महिन्यांपासून खूपच मेहनत घेतली आहे. भारताने 2-0 ने मालिका जिंकल्याचे श्रेय प्रशिक्षकांनाही दिले. यावेळी माजी गोलंदाज आणि प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद व रॉबिनसिंग यांचा सुद्धा उल्लेख केला.

Advertisements

सकाळ वृत्तसेवा :मुंबईतील पहिली हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू

•फेब्रुवारी 24, 2009 • टिपणी करा

मुंबई – हृदयरोग्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुंबईतील पहिल्या हवाई रुग्णवाहिका सेवेचे उद्‌घाटन आज राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते करण्यात आले. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट व तुलसियानी ट्रस्ट यांच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली असून, एशियन हार्ट हेल्पलाईन 126 126 ही सेवाही कार्यान्वित करण्यात आली आहे. 24 तास असणाऱ्या या हेल्पलाईन सेवेद्वारे हृदयरोग्यांना प्रशिक्षित डॉक्‍टरांकडून हवी ती माहिती उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. अंबुमणी रामदोस आणि चित्रपट अभिनेता अक्षयकुमार यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती. एखाद्या व्यक्तीला वेळी-अवेळी हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ रुग्णवाहिका वा आवश्‍यक ते उपचार न मिळाल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळेच हृदयरोग्याला तत्काळ रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणा असलेल्या अशा 37 रुग्णवाहिका आणि एक हवाई (हेलिकॉप्टर) रुग्णवाहिका “एशियन हार्ट’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. कुठल्याही मोबाईल वा दूरध्वनीवरून 126 126 हा क्रमांक फिरविल्यास 15 ते 30 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या रुग्णवाहिकांमध्ये डॉक्‍टर, नर्स यांच्यासह आवश्‍यक त्या औषधांची सोय करून देण्यात आली आहे. मुंबई वा विशेषतः मुंबईबाहेरील रुग्णांना तत्काळ हवाई रुग्णवाहिकेची सेवा हवी असल्यास तीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे; मात्र या हवाई सेवेसाठी प्रतितास 85 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. तर इतर रुग्णवाहिकांसाठी प्रतितास 1500 रुपये इतका खर्च आहे. गरीब रुग्णांसाठी दोन्ही सेवांत सवलती देण्यात येणार असून, गरीब रुग्णाला जर शासकीय वा पालिका रुग्णालयात तत्काळ दाखल करायचे असल्यास त्याला रुग्णवाहिकेची सेवा मोफत दिली जाणार आहे.

याशिवाय हृदयरोगासंबंधीची हवी ती माहिती 126 126 या क्रमांकावर मिळणार आहे. हृदयरोग हा महागडा आजार असल्याचे म्हटले जात असून, शस्त्रक्रिया वा अत्याधुनिक पद्धतीच्या उपचारांची गरज पडल्यास रुग्णाला तिथल्या तिथे 50 हजार रुपयांचे कर्ज “एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’तर्फे भारतीय स्टेट बॅंकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यासाठी नाममात्र व्याजदर आकारले जाणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेसाठी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचा “एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’चा विचार असून, हे हेलिपॅड तयार झाल्यास हेलिकॉप्टरची अर्थात हवाई रुग्णवाहिकांची संख्या 8 ते 10 अशी करण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी दिली.

रामदोस, राज्यपाल जमीर व अक्षयकुमार या सर्वांनी या सेवेचे कौतुक करीत ही सेवा हृदयरोग्यांसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हृदयरोग्यांना या सेवेमुळे तत्काळ उपचार मिळणार असल्याने हृदयरोगाच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार – जयश्री पेंढरकर

•डिसेंबर 12, 2008 • टिपणी करा

वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्‍यक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. …….
एकदा का रजोनिवृत्तीचा काळ व्यवस्थितपणे पार पडला, की साठीची चाहूल लागते. जीवनाच्या निवृत्तीकडे वाटचाल सुरू होते.

वृद्धत्व ही नैसर्गिक क्रिया आहे. शरीराची वाढ व वयात येणे होईपर्यंत शरीरातील जडणघडणीच्या क्रिया अधिक, तर पुढे विघटनाच्या क्रिया पेशींमध्ये अधिक होतात. म्हणून वृद्धत्व येते. साठीनंतर शरीरातील आवश्‍यक पेशींचा ऱ्हास होत असतो. शरीरक्रमांमध्ये बदल घडून येत असतात. वयोपरत्वे ऐकणे, दृष्टी, चव, स्पर्श, वास वगैरे संवेदना कमी होऊ लागतात. शरीरात फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजिकल, मानसिक बदल होत असतात. याची कारणेही अनेक आहेत. शारीरिक हालचालींची कमतरता, भूक मंदावणे, आपली कोणाला गरज नाही याची सतत बोचणी असणे, एकटेपणाची भावना सतावणे, वगैरे! शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो- ज्याकरिता आहाराचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. तरीही तो संतुलित मात्र हवाच.

आहारात सकाळचा नाश्‍ता घेणे अत्यंत आवश्‍यक असते. तो सकाळी ८ ते ९ पर्यंतच घ्यायला हवा. त्यात आपले जुने पारंपरिक पदार्थ हवेत. दुपारचे जेवण एक वाजता. त्यात चौरस आहार- ज्यात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ असावे. संध्याकाळी ५ ते ६ मध्ये हलका कोरडा नाश्‍ता- ज्यात चिवडा, लाह्या, सत्तू, गोपाळकाला, रताळी असे पदार्थ चांगले. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान व दुपारसारखेच! रात्री दही व फळ खाऊ नये. झोपताना दूध, हळद, अंजीर घ्यावे.

अन्न घटकांची गरज
कॅलरीज – हे नेहमी श्रमांच्या तुलनेत असतात. साठीमध्ये चयापचयाची गती कमी होते. म्हणून पूर्वीपेक्षा निदान ३०० कॅलरीज तरी कमी घ्याव्यात. शीतपेये, ब्रेड, बिस्किटे, साखर, पेस्ट्री वगैरे टाळावे.

प्रोटिन्स – मानसिक ताणतणाव, इन्फेक्‍शन, जुने रोग वगैरे असल्यास जरा अधिक, पण सहज पचणारे प्रोटिन्स घ्यावेत. भरपूर दूध, दही, ताक घ्यावे. डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला सोपी. इतर कडधान्ये मोड आणून घेतल्यास चांगले.

कार्बोहायड्रेट्‌स – शरीरात इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढते म्हणून व कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्‌स रक्तातील वाढलेले असल्यासही आहारात साखर नसावी. त्याऐवजी संपृक्त कर्बोदके म्हणजे धान्ये, फळे, डाळी, दूध यांचे सेवन असावे. यातूनच चोथाही मिळतो. दातांचा त्रास असल्यामुळे पॉलिश तांदळाचे, ब्रेड-बिस्किटांचे अधिक आणि भाकरीचे कमी सेवन होते. यामुळे “ब’ जीवनसत्त्वे मिळत नाहीत; पण आहारात ज्वारी, बाजरी, गहू, सोजी, हातकुटाईचे तांदूळ, कंदमुळे, फळे हवीत. जिभेवर ठेवल्यावर विरघळणारे पदार्थ टाळावे.

स्निग्ध पदार्थ – रिफाइंड तेल, वनस्पती तूप, लोणी, साय, चीज, मिठाई, तळलेले पदार्थ, पुऱ्या, पराठे कमी होणे अत्यंत आवश्‍यक असते. दिवसभरात ३ चमचे घाणीचे ताजे तेल आणि दीड चमचा तूप आहारातून मिळावे. वनस्पतींपासून निघणाऱ्या तेलात कोलेस्टेरॉल नसते. ते पशूंच्या स्निग्धात, वनस्पती तुपात असते. कोरोनरी हार्ट डिसीजने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मेनोपॉजनंतर अधिक आहे. म्हणून वनस्पती तूपही टाळावे. मांसाहार घेऊ नये.

चोथा – साठीनंतर शरीराचे श्रम, हालचाली कमी होतात. म्हणून आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते. आतड्यांतील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण या क्रिया मंदावतात. अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता सरसकट अनेकांमध्ये आढळून येते. याकरता गव्हाचा दलिया, पालेभाज्या, शेंगभाज्या, ज्वारी, बाजरी, फळे, ओवा, मेथीदाणा, नाचणी, हळीव, कारळी, कुळीथ, जवस यासारख्या गोष्टी रोजच्या आहारात असाव्यात.

कॅल्शिअम -. रोज १/२ ते ३/४ लिटर दूध हे दही-ताकाच्या रूपात घ्यायलाच हवे. कॅल्शियमवर प्रोटिन्स जीवनसत्त्व “क’चे शोषणही अवलंबून असते. अन्नाचे पचन सुलभ होते. याशिवाय नाचणी, खसखस, हळीव, सोयाबीन, खजूर, पालेभाज्या रोज खाव्यात. भात शिजवताना त्यात चिमूटभर मऊ असा खायचा चुना घालावा.

लोह – रक्तकण, हिमोग्लोबिन तयार होण्याकरिता या खनिजाची आवश्‍यकता असते. लोह सर्व पालेभाज्या, खजूर, बाजरी, नाचणी , मनुका, अंजीर, हळीव यात भरपूर असते. भाज्या, सलादवर लिंबू पिळूनच खावे.

जीवनसत्त्वे – अ, ई, क, बीटा कॅरोटिन यांना अँटीऑक्‍सिडंट्‌स म्हणतात. ते पेशींचा ऱ्हास होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. दूध, दही, तेलबिया, गव्हांकुर, गव्हाच्या रोपांच्या रसातून, लाल भोपळा, गाजर, पपई, रताळं, तीळ, खसखस, खरबूज, टरबूज बियांतून मिळतात. जीवनसत्त्व “ड’ हाडांच्या मजबुतीकरता, नितळ निरोगी त्वचेकरता आवश्‍यक. ते दूध, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं. वृद्धांना हिंडणं-फिरणं कठीण होतं. तरी शक्‍यतोवर सकाळच्या वेळी बाहेर येणं आवश्‍यक.

झिंक – वृद्धांमध्ये या खनिजाची कमतरता होते, म्हणूनही रोगप्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून धान्ये, डाळी वगैरे सालासकट खावे.

बहुतेक ज्येष्ठांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असतात. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्‍यक असते. हृद्‍रोगातही ते कमीच हवे. जोडीला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे क्षार वाढवायची गरज असते. त्याकरता हिरव्या भाज्या, पुदिना, कोथिंबीर, फळे, सुका मेवा या गोष्टी रोज खाव्यात.

हिरड्यातून रक्त येणे, झालेल्या जखमा चिघळणे, हेही वृद्धांमध्ये आढळते. म्हणून नैसर्गिक स्वरूपात “क’ जीवनसत्त्व घेणे फायदेशीर ठरते. मोतीबिंदू तयार होणे, पिकणे या गोष्टी “क’ जीवनसत्त्वाने लांबविता येतात. म्हणून आवळा, लिंबू, फळे, सलाद भरपूर खावे. तसेच फोलिक ऍसिड, जीवनसत्त्व ब ६ याचीही कमतरता दिसते. रक्तातील होमोसिस्टीनचे वाढलेले प्रमाण, या जीवनसत्त्वांची कमतरता तर हृद्‍रोगाची नांदी दर्शविते. सहसा हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे वगैरे गोष्टी जीवनसत्त्व ब १२ ची कमी दाखवतात. याकरता रोज भरपूर भाज्या, फळे, ताक व अंकुरित कडधान्ये व यीस्टच्या गोळ्याही घ्याव्यात.

– जयश्री पेंढरकर,
आहारतज्ज्ञ, नागपूर.

अमेरिकन इफेक्‍ट’मुळे निर्देशांक पुन्हा एकदा कोसळला

•सप्टेंबर 18, 2008 • टिपणी करा

मुंबई – आठवड्याच्या सुरवातीपासून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात होत असलेली घसरण गुरुवारीही कायम राहिली. गुरुवारी बाजार सुरू होताच निर्देशांक तब्बल ६०० अंशांनी कोसळला. घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा एकदा १३ हजारांच्या खाली गेला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही गुरुवारी सकाळी घसरण झाली. निफ्टी १७९ अंशांनी घसरला.

आशियातील इतर बाजाराचे निर्देशांकही गुरुवारी तीन ते चार टक्‍क्‍यांनी घसरले. त्यापार्श्‍वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोसळणे अपेक्षित होते, असे काही शेअर दलालांचे मत आहे.

“वॉल स्ट्रीट’च्या निर्देशांकाने बुधवारी गेल्या तीन वर्षांतील निच्चांकी पातळी गाठली. अमेरिकेतील “अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप’च्या (एआयजी) मदतीला “फेडरल रिझर्व्ह’ बॅंक धावून आली असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये त्यामुळे फारसा विश्‍वास निर्माण झाला नाही. यासर्वाचा परिणाम गुरुवारी मुंबई शेअर बाजारावर झाला.

अमेरिकेतील आर्थिक क्षेत्रातील दिवाळखोरीची छाया गेला आठवडाभर मुंबई शेअर बाजारावर कायम राहिली आहे.

अभिनव बिंद्राचे हार्दिक अभिनंदन

•ऑगस्ट 13, 2008 • टिपणी करा

ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची मान उंच केल्याबद्दल अभिनव बिंद्राचे हार्दिक अभिनंदन!

कॉफीशॉप

•ऑगस्ट 13, 2008 • टिपणी करा

(मामू)
बीजिंगनगरीत ऑलिंपिकचं भव्य, नेत्रदीपक, अनुपम, अद्‌भुत उद्‌घाटन पाहिल्यानंतर चि. राहुल आणि चि. सौ. प्रियांकाताईनं अख्खा चीनच पाहण्याचा हट्ट आईकडं धरला. मातृहृदयच ते! तिनं लगेच लेकरांचा हट्ट पुरवायचं कबूल केलं. तिघंही गेले चीनच्या ग्रेट वॉलवर! “वॉव’ असा उद्‌गार काढून मुलं आईला म्हणाली, “”आई, आई… आपल्याकडं एवढी मोठी भिंत का नाही?” ……..
तेवढ्यात आवाज आला, “”नारायण… नारायण…”

आई एकदम दचकली. तिला वाटलं, इथंही आले की काय मागं मागं? पण पाहते तो साक्षात नारदमुनी! “हुश्‍श’ करून आई म्हणाली, “”तुम्ही होय… बरं झालं! वेळेवर आलात! आता द्या आमच्या मुलांना उत्तरं…” मुनी म्हणाले, “”अरे, कोण म्हणतं तुमच्याकडं भिंत नाही? राज्या-राज्यात, प्रांता-प्रांतात, धर्मा-धर्मांत केवढ्या भिंती आहेत. त्यापुढं ही भिंत काहीच नाही…”

मग नारद सर्वांना घेऊन शांघायमध्ये आले. ते अजस्त्र शहर पाहून मुलं म्हणाली, “”आई, आई, आपल्याकडं असं शहर का नाही?” आईनं मुनींकडं कटाक्ष टाकला. ते म्हणाले, “”अरे, तुम्ही मुंबईचं हे करणारच आहात. शिवाय आत्ता नसलं म्हणून काय झालं? तुमच्या राजधानीतली अतिक्रमणं हटवायचा विषय आला, की सर्वोच्च न्यायालयदेखील म्हणतं, साक्षात नारायण, म्हणजे परमेश्‍वर आला तरी काही सुधारणा होण्याची शक्‍यता नाही. असं तुमचं नगर नियोजन! मागं आमचे विष्णूमहाराज असंच गरुडावरून फिरत फिरत मुंबईत आले… तर असे टरकले, की पुन्हा नाव नाही काढलं मुंबईचं! कुठली तरी खडाजंगी ऐकली बहुतेक त्यांनी.”

प्रियांकाच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह कायम होतं. राहुलला अधूनमधून “कलावती’ आठवत होती. बीजिंगमधलं ऑलिंपिक व्हिलेज, “बर्डस नेस्ट’ आणि ऑलिपिंक ग्रीन हे सगळं वैभव पाहिल्यावर राहुलला राहवेना. चीनच्या प्रगतीचं रहस्य त्याला अस्वस्थ करीत होतं. त्यानं तिथं कचरा साफ करणाऱ्या माणसाला विचारलं, तर तो त्याचे मिचमिचे डोळे आणखी मिचमिचवून “थॅंक्‍यू’ म्हणाला. नारद हसून म्हणाले, “”त्याला “वेलकम’ आणि “थॅंक्‍यू’ एवढंच इंग्रजी येतं. तो पदवीधर तरुण आहे. हौस म्हणून हे काम करतोय ऑलिंपिकच्या काळात…” मग मुनी त्या सगळ्यांना घेऊन एका शाळेत गेले. मुलं “एकसाथ नमस्ते’ला मॅंडरिन भाषेत जे काय म्हणतात, ते म्हणाली. इतिहासाचा तास सुरू होता. राहुलनं गुरुजींना विचारलं, “”इतिहास का शिकवता?” गुरुजी म्हणाले, “”ज्यांना उज्ज्वल इतिहास असतो, तेच उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकतात…” ते भव्य स्टेडियम, त्या लाल-पिवळ्या गर्द छटा सगळं राहुलभोवती फिरू लागलं… जाग आली तेव्हा विमान दिल्लीत लॅंड होत होतं… खिडकीतून “यमुने’चं दर्शन होताच “ये जो देस है मेरा… स्वदेस है मेरा’ हे रेहमानचे शब्द कानी घुमू लागले… शेजारून पुन्हा आवाज आला, “”नारायण… नारायण…” राहुल डोळे चोळत पाहू लागला, तसे नारदमुनी हसत म्हणाले, “”ड्रॅगनला गाठायचं, तर हिमालय ओलांडण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेव…”

– मामू

रस्त्यारस्त्यांवर अतिघाई – हमखास संकटात जाई

•जुलै 17, 2008 • १ प्रतिक्रिया

लिफ्टमध्ये बसताना, रस्त्यावर गाडी चालविताना, जिने चढता-उतरताना, खरेदी करताना, रस्ता ओलांडताना, स्वयंपाक करताना…अशा नको त्या वेळी मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढते आहे.