सुखसंवाद साधा

सगळ्या संतांचे व्यवच्छेदक लक्षण कोणते असेल तर ते म्हणजे वाद टाळणे होय. संत कधीही वाद घालीत बसत नाहीत. ते सत्याचा शोध घेतात. ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा मनुष्य अंतर्यामी शांत होऊन जातो. अहंकारी माणसे वादासाठी निमित्त शोधत असतात. भाषेचा वाद, प्रांताचा वाद, पाण्यावरून वाद, जाती आणि धर्म यावरून वाद यामुळे देशाचा विकास कुंठित होतो. कोणता नेता श्रेष्ठ, कोणता नेता कनिष्ठ यावरून सध्या जे वाद चालू आहेत, ते पाहिले म्हणजे आपण खरेच विज्ञानयुगात वावरत आहोत का याची शंका येऊ लागते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी निवडणुकांच्या प्रचार सभेत जी प्रक्षोभक भाषा वापरतात ती ऐकली म्हणजे माणूस अजूनही रानटी अवस्थेत आहे असे वाटू लागते. म्हणून समर्थ रामदास अत्यंत कळवळून म्हणतात-

जनी वाद वेवाद सोडूनि द्यावा। जनी सुखसंवाद सुखे करावा।

जगी तोचि तो शोक संताप हारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी।।

अनेकदा वाद घालण्याचे मुद्दे अत्यंत क्षुल्लक असतात, पण त्यामुळे मनाचे संतुलन ढळते. दिवसेंदिवस अहंकार परिपुष्ट होत राहतो म्हणून समर्थांनी सुख संवाद हा शब्द वापरला. ज्या संवादाचा शेवट सुखद होतो तो सुख संवाद होय. अनेकदा आपले मत दुसऱ्यावर लादण्यासाठी माणसे वाद घालीत बसतात, पण हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही. माणसाने प्रत्येकाची भूमिका समजावून घ्यावी. भिन्न भिन्न विचार प्रवाह या विकासाच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत, हे लक्षात घ्यावे. महापुरुषांवरून वाद घालणे हे तर कोत्या मनाचे लक्षण आहे. एखाद्या राष्ट्रपुरुषावर प्रेम करणे म्हणजे अन्य राष्ट्रपुरुषांचा तिरस्कार करणे नव्हे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मात्र वैचारिक मतभेदांचे रूपांतर कधीही द्वेषामध्ये होता कामा नये. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते; परंतु दोघांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. इंग्रज सरकारच्या सांगण्यावरून शाहू महाराज लोकमान्य टिळकांकडे गीतारहस्य या ग्रंथाची हस्तलिखित प्रत मागण्यासाठी आले, तेव्हा टिळकांनी अत्यंत विश्वासाने ती प्रत महाराजांकडे दिली. शेवटी शेवटी लोकमान्य आजारी होते, तेव्हा त्यांच्या सेवेसाठी शाहू महाराजांनी माणूस पाठविला होता.

आज माणूस बौद्धिकदृष्ट्या आश्चर्यकारक प्रगत होतो आहे. पण मानसिकदृष्ट्या त्याचे खूप पतन होते आहे. म्हणून समर्थ म्हणतात-

हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधूनि पाहे।

हिताकारणे बंड पाषांड वारि। तुटे वाद संवाद तो हीतकारी।।

तुटे वाद संवाद तेथे करावा। विवेके अहंभाव हा पालटावा।

जनी बोलण्यासारिखे आचरावे। क्रिया पालटे भक्तिपंथेचि जावे।।

सुखसंवादामध्ये हितासाठी बोलले जाते. अनेक विचारांची फुले एकत्र करून सद्भावांचा गुच्छ तयार केला जातो. माणसाने बोलणे सुधारण्यापेक्षा वागणे सुधारावे यावर समर्थ भर देतात. श्रीमद् दासबोधाची सुरुवातच मंगलाचरणाने आहे. ज्यांचे आचरण मंगल आहे ती माणसे कधी वादात पडत नाहीत. प्रत्यक्ष आचरणात काही नसते, पण बौद्धिक अभ्यास खूप झालेला असतो असा माणूस ज्ञानाच्या अहंकाराने वाद घालून स्वत:चे नुकसान करून घेतो. समर्थ म्हणतात-

जनी हित पंडित सांडित गेले। अहंतागुणे ब्रह्माराक्षेस जाले।

तयाहुन वित्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणिव सांडोनि राहे।।

माणसाने जाणीव सांडून राहावे याचा अर्थ आपण फार ज्ञानी आहोत ही जाणीव टाकून द्यावी. या जगात परमेश्वरापेक्षा ज्ञानी कोण आहे? म्हणून न्यूटनच्या जीवनातील तो प्रसंग आठवावा-

एकदा न्यूटन आपल्या मित्राबरोबर समुदाच्या काठी फिरत होता. न्यूटनच्या अफाट ज्ञानाबद्दल त्याच्या मित्राला न्यूटनबद्दल खूप अभिमान वाटत होता. न्यूटनची प्रशंसा करीत तो म्हणाला- ‘आपण किती ज्ञानी आहात? या जगात आपल्याएवढा बुद्धिमान मनुष्य नसेल.’ त्यावर अत्यंत नम्रपणे न्यूटन म्हणाला- ‘या समुदाच्या काठी जी वाळू पसरली आहे त्यातील एका कणाएवढे माझे ज्ञान आहे. मात्र माझे अज्ञान अफाट आहे.’ समर्थ मना सर्व जाणीव सांडूनि राहे असे म्हणतात ते या अर्थाने.

आपण विज्ञानयुगात वावरत आहोत. ज्ञानाच्या विविध शाखा रोज विकसित होत आहेत. तसतशी माणसाला आपल्या अज्ञानाची कल्पना येऊ लागली आहे, असे असताना कसचा गर्व करणार आणि कशाचा ताठा धरणार? आपल्यापेक्षा जगात कितीतरी ज्ञानी माणसे आहेत याचे भान असायला हवे. असा माणूस कोणाशी वाद घालील आणि कोणासाठी वाद घालील? विचाराने आपण विनम्र आणि प्रगल्भ झाले पाहिजे. व्यापकता हे ज्ञानाचे खरे लक्षण आहे.

~ by manatala on जुलै 27, 2007.

यावर आपले मत नोंदवा