॥ श्रीमनाचे श्लोक – भाग १ ॥

॥ श्रीमनाचे श्लोक ॥

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥

इंद्रियांचा स्वामी आणि सर्व गुणांचे अधिष्ठान तसेच निर्गुणाचा आरंभ असणार असा जो गणेश त्यास आणि चारही वाणींचे मूळ असणारी शारदा, या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराच्या दर्शनाचा मार्ग मी समजावून देतो.


मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।
जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें।
जनीं वंद्य तें सर्वभावें करावे॥

सज्जना मना! तूं भक्तिच्याच मार्गाने जा. भक्तिमार्गानें गेल्यास तुला ईश्वराचे दर्शन आपोआप होईल. समाजघातक सारीं कर्में तूं सोडून दे व समाज हिताची सारीं कर्में तू अगदी मनापासून कर.


प्रभातें मनीं राम चिंतीत जावा।
पुढें वैखरीं राम आधीं वदावा।
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥

पहाटे मनानें भगवंताचे चिंतन करावे. नंतर वाणीने त्याचे नाव घ्यावे, भजन करावें. सदाचरण फार श्रेष्ठ असतें. माणसाने तें सोडू नये. असें वागणारा माणूसच जगांत धन्या होतो.


मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुद्धि नको रे।
मना धर्मता नीति सोडूं नको हो।
मना अंतरी सारविचार राहो॥

मना! दुष्ट वासना ठेवूं नकोस, पापबुद्धि मुळींच वागवू नकोस. नितीधर्माचे आचरण सोडूं नकोस. जीवनात जें खरोखर चांगलें व श्रेष्ठ आहे त्याचा विचार अंतर्यामीं करीत जा.


मना पापसंकल्प सोडोनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जिवीं धरावा।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारें घडे हो जनीं सर्व छी छी॥

मना! जें टिकणारें नाहीं त्याची वासना सोडून दे. जें टिकणारें आहे त्याची इच्छा आवडीनें कर. देंहातून सुख घेण्याचे मनोरथ रचूं नकोस. इंद्रियसुखांच्या नादीं लागलेल्या माणसाची जगात फजितीं होते.


नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नानाविकारी।
नको रे मदा सर्वदा अंगीकारूं।
नको रे मना मत्सरू दंभभारू॥

अरे मना! क्रोधानें माणसाचा स्वतःवरील ताबा नाहींसा होतो. म्हणून तूं त्याच्यापासून दूर राहा. काम वासना माण्सामध्यें नाना दोष व विकार निर्माण करते. म्हणून तिच्या आधीन होऊ नकोस. त्याचप्रमाणें कोणाचा व्देष करूं नकोस. शिवाय मोठें ढोंग कधीं करूं नकोस.


मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें।
मना बोलणें नीच सोशीत जावें।
स्वयें सर्वदा नम्र वाचें वदावें।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥

मना! अंतर्यामीं उत्तम व सात्विक धैर्यधारण करावें. कोणी आपल्याला हलकीं दुरुत्तरें केलीं तरी तीं शांतपणें सोसावीत. पण स्वतःमात्र विनयशील वाणीनें भाषण करावें. अशारीतीनें सभोवारच्या सर्व लोकांचा अंतरात्मा अगदी शांत करावा, संतुष्ट व त्रुप्त करावा.


देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें।
परी अंतरीं सज्जना नीववावें॥

सज्जना मना! जीवनामध्यें आपण अशी कर्में कीं म्रुत्यूनंतर आपली कीर्ति शिल्लक राहिल. आपला देह लोकांसाठीं चंदनासारखा झिजवावा. त्यामुळें सत्पुरुषांच्या अंतःकरणास मोठा संतोष होतो.  


नको रे मना द्रव्य तें पुढिलांचें।
अति स्वार्थबुद्धिन रे पाप सांचें।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें।
न होतां मनासारिखें दुःख मोठें॥

मना! आपल्या आगोदर ज्यांनीं द्रव्य मिळवून ठेंवले आहे त्या द्रव्याचा अभिलाष करूं नकोस. दुसर्याचें द्रव्य आपल्याल फुकट मिळावें असे वाटणे हें अतिस्वार्थबुद्धीचें लक्षण आहे. अशा स्वार्थ बुद्धीनें पाप संचय होतो. ज्या कर्मानें पाप भोगावें लागतें ते कर्म वाईट असतें. शिवाय स्वार्थबुद्धीनें वाईट कर्म करून देखिल मनासारखें घडून आलें नाहीं तर मात्र फार दुःख होतें.  

१०
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी।
दुःखची स्वयें सांडी जीवीं करावी।
देहेदुःख तें सूख मानीत जावें।
विवेके सदा स्वस्वरूपीं भरावें॥

सर्वकाळ भगवंताची आवड बाळगावी. आपल्या मनांत आपल्या दुःखाची जाणीव राहते. आपण्हून त्या जाणिवेचें विस्मरण करावें. इतकेंच नव्हे तर देहाच्या दुःखाला सूख मानण्याचा अभ्यास करावा. नित्य व अनित्य यांतील भेद जाणून आपले अंतरंग भगवंतानें भरण्याचा सतत अभ्यास करावा.

~ by manatala on जुलै 25, 2007.

यावर आपले मत नोंदवा