ऐका कहाणी जिवतीची

एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ‘ मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये , तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.

ब्राह्माणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्ाावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ‘ जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही , तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. राजाला पश्चाताप झाला.

पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली , ‘ बाळ , हीच तुझी खरी आई. राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.

अशी ही जिवतीची कहाणी.

आजही श्ाावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय , हे जिवतीआई , तू त्याचे रक्षण कर. अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.

काळ बदललाय. अष्टपुत्रा सौभाग्यवती होऊन घराचे गोकुळ करण्याचे दिवस सरलेत. तरीही आपल्या चौकोनी कुटुंबातले वातावरण नांदत्या गोकुळासारखेच असावे यासाठी नव्या युगातली जिवती मनोमन व्याकुळलेली असते. आता क्षितीज रुंदावले आहे. मुलेबाळे मोठी होऊन सातासमुदालीकडे जातात. जगाच्या पाठीवर कोणत्या तरी अनोळखी प्रांतात असलेले आपले बाळ सुखात असावे यासाठी तिचा जीव तीळतीळ तुटतो.

वेष बदलले. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना. ती सुफळ संपूर्ण होवो.

प्रतिमा जोशी

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 3, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: