श्री क्षेत्र आंभोरा

तीर्थाहूनी निराळे पावित्र्य संगमाचे’ असे म्हटले जाते. अर्थात दोन नद्यांचा संगम असलेले ठिकाण हे पवित्र म्हणून ओळखले जाते.तर मग दोन-तीनच नव्हे, तर पाच-पाच नद्यांचा संगम होतो, ते स्थळ तर यापेक्षा कितीतरी पटीने पवित्र असावे, होय ना! म्हणूनच मुकुंदराजांनी श्री क्षेत्र आंभोरा निवडून तेथे मराठीचा आद्यग्रंथ लिहिला. याच ठिकाणी “शिवलिंग’ हे स्वयंभू प्रकट झाले असून, श्रावणमासात भाविकांची मोठी रीघ लागलेली असते.

“ज्ञानेश्‍वरी’च्या शंभर वर्षांपेक्षा आधी म्हणजे १११० मध्ये मुकुंदराजांनी श्री क्षेत्र आंभोरा येथे “विवेकसिंधू’ची रचना केली.
“वैनगंगेच्या तीरी । मनोहर अंबानगरी।।
तेथे प्रकटले श्रीहरी । जगदीश्वरु।।
शके अकराशे दाहोत्तर । साधारण नाम सवंत्सर।।
तै राजा शारंगधर । ग्रंथ उभार पै ज्याला।।
ऐसा नाम सर्वोत्तम । तेथ मुकुंद द्विजित्तम।।
विवेकसिंधू ग्रंथ मनोरम । निर्मिती झाला।।

यावरून आपल्याला “विवेकसिंधू’ची निर्मिती याच ठिकाणी झाल्याचे स्पष्ट होते. या पवित्रस्थळी मुरझा, कोलार, कन्हान, आम आणि वैनगंगा या पाच नद्यांचा मनोहारी संगम पाहावयास मिळतो. येथे श्री गणेश मंदिर, कोलेश्‍वर, विठ्ठल-रुक्‍मिणी, दुर्गामाता, चैतन्येश्‍वर (शिवलिंग), रंगलालबाबा मंदिर आहे. हिंदू धर्मासोबतच बौद्धबांधवांकरिता दीक्षाभूमी आणि मुस्लिम बांधवांचे पवित्र स्थळ “दरगाह’सुद्धा येथे आहे, हे विशेष!

श्री क्षेत्र आंभोरा येथे मुकुंदराजांचे गुरू होमहवन करताना त्यातून अचानक शिवलिंग प्रकट झाले, अशी कथा आहे. हे स्वयंभू शिवलिंग त्यानंतर चैतन्येश्‍वर मंदिरात स्थापित करण्यात आले. भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, समाधान मिळत असल्याने आज येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावतीसह मराठवाड्यातील भाविकही येथे नतमस्तक होतात.

निसर्गरम्य वातावरण, पाच नद्यांचे देखणे रूप, अथांग पाणी, शांत परिसर यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांचा थकवा निघून जातो. मात्र सध्या “क’ श्रेणीत असलेल्या श्री क्षेत्र आंभोरा या तीर्थक्षेत्राकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने अद्यापही हे “ब’ श्रेणीत येऊ शकले नाही. खाणावळ, हॉटेल्स, राहण्याची व्यवस्था, पार्किंग सुविधा नसल्याने येथे आलेल्या भाविकांची मात्र निराशा होते. नागपूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या या तीर्थस्थळाचा विकास कधी होणार, असा प्रश्‍न करून भाविक आल्यापावली परततात.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 23, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: