घडताहेत “तानसेन’… आणि “कानसेन’ही!

सध्या रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम सादर होताना दिसताहेत. प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या वाहिन्या नवनवे “तानसेन’ जसे घडवताहेत, तसे “कानसेन’सुद्धा घडवताहेत. कदाचित ही “लाट’ असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं! ……..
धुवांधार पाऊस पडतोय. आकाशात काळ्या ढगांची मांदियाळी आहे. झाडं हिरवीगार होऊन जणू पानांच्या सळसळाटात एखादं धुंद गाणं गाताहेत. सभोवतालचं वातावरण असं असताना एखाद्या नाट्यगृहात संगीताची मैफल सादर होत असेल, तर त्याची मजा लुटणं हा आनंद काही विरळाच. सध्या रंगभूमीवर अशा प्रकारच्या अनेक मैफली, वाद्यवृंद सादर होताना दिसताहेत. आणि त्याला प्रतिसादही उत्तम आहे.

अशा वातावरणाचा, धुंद मैफलीचा मागोवा घेता, रंगभूमीवर संगीताच्या कार्यक्रमांना चांगलेच दिवस आले आहेत हे स्पष्ट दिसतंय. अशा संगीताच्या मैफली तशा नवीन नाहीत. पुण्यातील गंधर्व महोत्सवात, मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये असे सांगीतिक कार्यक्रम प्रतिवर्षी सादर होतात; पण हल्ली नाटकांच्या जाहिरातींत प्रकर्षानं दिसतात, त्या संगीताच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीच. काही वर्षांपूर्वी तसं नव्हतं. मोजक्‍याच मैफली होत असत. असा कुणी परीसस्पर्श केला आणि अशा कार्यक्रमांना भव्य प्रतिसाद मिळू लागला?

व्यावसायिक निर्मात्यांचं म्हणणं, असं की रसिक प्रेक्षक कधी कुठल्या कार्यक्रमांना प्रतिसाद देतील हे ज्योतिषीही सांगू शकणार नाही. त्यांचं म्हणणं खरंच आहे. नाटकं कितीही दर्जेदार असली आणि त्यात दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असली तरी प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतीलच, असं नाही सांगता येत; पण संगीताच्या कार्यक्रमाबाबत तसं म्हणता येणार नाही. सध्या नाट्यगृहात सादर होणाऱ्या “मैफलीं’ना सरासरी बुकिंग ३० हजारांच्या आसपास होताना दिसतय. काही कार्यक्रमांना तर लाखाहून अधिक बुकिंग मिळतं. यात “मराठी बाणा’ हा अशोक हांडे यांचा कार्यक्रम अव्वल स्थानावर आहे. गेल्या दोन वर्षांत त्याच्याशी कुणी स्पर्धाही करू शकलेले नाही.

व्यावसायिक रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळतोय तो “थीम बेस’ कार्यक्रमांना. एकाच अभिनेत्याची, संगीतकाराची किंवा गायकाची हिंदी चित्रपटामधली गाजलेली गाणी सादर करणाऱ्या मैफलींना रसिकांचा प्रतिसाद मिळतोय, मिळालेला आहे. संगीतकार नौशाद, मदनमोहन, शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन इत्यादींच्या कार्यक्रमांना ओव्हरपॅक रसिक पाहून निर्माते सुखावलेत. अनेक नाट्यनिर्माते अशा प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती करण्याची मनीषा बाळगून असल्याचं जाणवतंय… १ ऑगस्टला “बिग बी ः यही है अमिताभ’ या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. (या कार्यक्रमात मोहन जोशींचा सहभाग आहे.)

हिंदी चित्रपटगीतांबरोबरच नवनवीन मराठी वाद्यवृंद, मैफलींनाही उधाण आलेलं दिसतय. “निसर्गराजा, “आठवणींचे सूर’, “धुंद बेधुंद’, “ऋतू हिरवा’, “बाबूजींची गाणी’, “गाणे हिंदोळ्याचे’ इत्यादी कार्यक्रमांची उदाहरणं प्रातिनिधीक म्हणून सांगू शकतो. अशा कार्यक्रमात श्रीधर फडके, माधुरी करमरकर, अजित परब, सुचित्रा बर्वे, गौरी कवी, वैशाली पाटील, आरती अंकलीकर, स्वप्नील बांदोडकर इत्यादी संगीत क्षेत्रात आघाडीवर असलेले गायक-गायिका प्रामुख्याने गाताना दिसत आहेत. शिवाय “झी’वरच्या “युद्ध ताऱ्यांचे’मुळे प्रसाद ओक, सुमित राघवन, सीमा देशमुख या अभिनेत्यांनाही गायक- गायिका म्हणून ओळख मिळू लागली आहे. याचा फायदा घेऊन त्यांचे कार्यक्रमही आयोजित केले जाऊ लागले आहेत.

अशा या संगीतमय कार्यक्रमांमुळे वादक कलाकार, संगीत संयोजक, निवेदक यांनाही चांगले दिवस आलेले दिसत आहेत. कार्यक्रमांसाठी अशा मंडळींना महिनामहिना आधी बुक करावं लागतंय. दिवस बदललेत याची साक्ष यावरून नक्कीच काढता येते.

अशा संगीतमय कार्यक्रमांना जे सोनियाचे दिवस आलेत, त्याचं श्रेय मराठी-हिंदी वाहिन्यांना द्यावंच लागेल. कारण- प्रत्येक वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या वाहिन्या नवनवे “तानसेन’ जसे घडवताहेत, तसे “कानसेन’सुद्धा घडवताहेत. कदाचित ही “लाट’ असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं!

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: