मेंदूचा व्यायाम – वाचन

आपण माहिती कशी मिळवतो? वाचून आणि ऐकून. म्हणजे वाचणं आणि ऐकणं या ज्ञानसंपादनाच्या महत्त्वाच्या पायऱ्याच म्हटल्या पाहिजेत. वाचनातून आणि श्रवणातून मिळालेली माहिती मेंदू स्मरणात व्यवस्थित साठवून ठेवतो. साठत जाणाऱ्या माहितीला नवीन वाचनाची, श्रवणाची, अनुभवांची जोड मिळत जाते आणि त्या त्या व्यक्तीमध्ये एक वेगळंच रसायन तयार होत जातं. लेखणीतून, वाणीतून किंवा कृतीतून त्याची अभिव्यक्ती होते. परीक्षेमध्ये, भाषणामध्ये, लेखनामध्ये किंवा प्रत्यक्ष जीवनात त्याची चुणूक दिसते. वेगळं, स्वतंत्र रूप घेऊन येणाऱ्या, व्यक्त होणाऱ्या या प्रतिभेलाच आपण नवनिर्मिती म्हणतो. म्हणजे वाचन हा नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील कच्चा मालच म्हटला पाहिजे. विद्यार्थिदशेत, वाढीच्या वयात वाचन आणि व्यायाम यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीराला जशी व्यायामाची, तशी मनाला वाचनाची नितांत गरज असते. वाचन हा मेंदूचा व्यायामच. मेंदूचा हा व्यायाम सुरू करायचा म्हणजे सर्वप्रथम पुस्तकावर नजर खिळली पाहिजे. यासाठी भिरभिरणारं मन शांत पाहिजे. झोप पूर्ण व्हायला पाहिजे आणि पोट भरलेलं पाहिजे. भुकेल्या पोटी आणि भरकटल्या मनी ज्ञानग्रहण कसं शक्‍य आहे?

कित्येक मुलांचं मन एकाग्र होत नाही. वाचताना लक्ष सारखं दुसरीकडे जातं. स्वयंपाकघरातले वास, शेजाऱ्यांच्या घरातले तारस्वरातले संवाद, टीव्हीचा आवाज, गल्लीतील खेळणाऱ्या मित्रांचा गलका अशा अनेक गोष्टी मनाला खेचत असतात. वाचताना वातावरण शांत लागतं ते याचसाठी. ग्रंथालयाचं शांत वातावरण वाचनासाठी पोषक असतं. चित्त विचलित करणारे उद्दीपक नसल्यामुळे ग्रंथालयात पुस्तकांशी लगेच गट्टी जमते. मनाची एकाग्रता कमी करणारा आणखी एक घटक म्हणजे रक्तातील लोहाची कमतरता. हळीव, नाचणी, गूळ, हिरव्या भाज्या या पदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं. पालकांनी दैनंदिन आहारात त्याचा जरूर समावेश करावा. झोपून वाचणं, कमी प्रकाशात वाचणं, चष्मा असूनही न वापरणं किंवा चुकीच्या नंबरचा चष्मा वापरणं, शरीरप्रकृती ठीक नसणं इ. बाबींचा वाचनावर विपरीत परिणाम होतो. आपल्या मुलांनी वाचावं असं वाटत असेल तर आधी पालकांनी स्वतः वाचायला पाहिजे. रिकाम्या वेळेत पालकच टिव्हेरिया झाल्यासारखे वागत असतील, तर मुलंही तसंच करणार. आईबाबांना पुस्तकात रममाण झालेलं मुलांनी पाहिलं, तर लहानपणीच त्यांना वाचनाची गोडी लागेल, यात शंका नाही.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: