“मेड इन चायना’!

रंगपंचमीसाठीची साधी पिचकारी असो की कंपास बॉक्‍स, पट्टी, पेन्सिल आदी शालेय साहित्य, आधुनिक इलेक्‍ट्रॉनिक साधने असोत की मोटारसायकली… बाजारपेठ कोणत्याही देशातील असो आणि कोणत्याही वस्तूंची असो- “मेड इन चायना’चा शिक्का तेथे जाणवतोच. अमेरिकेतील नागरिक आपला राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवत असतात. हे राष्ट्रध्वजही चीनमध्ये तयार झालेले असतात! जागतिक बाजारपेठेवर चीनने कसे वर्चस्व निर्माण केले आहे याचे हे साधे उदाहरण. ……
चीनमध्ये तयार झालेल्या वस्तू दिसायला छान असतात आणि मुख्य म्हणजे तुलनेने खूपच स्वस्त असतात. आपली उत्पादने “डम्प’ करण्याच्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून स्वस्तात विकण्याच्या धोरणामुळेच तर चीन बाजारपेठेत स्पर्धेत टिकून आहे. चीनच्या या “आक्रमणा’बद्दल अनेक देशांत बोलले जात आहे. “अँटीडम्पिंग’ धोरणांची चर्चा होत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. मात्र सध्या चिनी उत्पादने सध्या चर्चेत आहेत, त्याचे कारण वेगळेच आहे.

चीनमध्ये तयार झालेल्या टूथपेस्टचा वापर केल्यामुळे पनामा येथे गेल्या वर्षी काही डझन लोकांचा मृत्यू झाला. (आणखी एका वृत्तानुसार मृतांची संख्या सुमारे शंभर आहे.) त्यानंतर चीनच्या उत्पादनांबद्दल जगभरच चिंता निर्माण झाली. त्यामुळे चीनला कृती करणे भाग पडले. चीनने अन्न आणि औषध नियंत्रक झेंग झियाऊ यांना या प्रकरणी मे महिन्यात दोषी ठरविले. टूथपेस्टसह अनेक वस्तूंना चाचणीशिवाय मान्यता देण्यासाठी हजारो डॉलरची लाच घेतल्याबद्दल झियाऊ यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि अलीकडेच ती अमलातही आणली. बेपर्वाई करणाऱ्या लाचखोर नोकरशहाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावून चीनने एक प्रकारचा संदेशच जगाला दिला. पण प्रश्‍न असा आहे, की यामुळे चीनची उत्पादने सुरक्षित ठरतात काय?

अमेरिकेतील ग्राहक लगेचच “होय’ असे उत्तर देत नाहीत. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, फळांचा रस, पाळीव प्राण्यांसाठीचे अन्न, खेळणी, टायर आदी अनेक चिनी उत्पादने अमेरिकेत मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनेही चीनमध्ये तयार झालेली असतात. त्यामुळेच तेथे चिनी उत्पादनांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, योग्य प्रकारचा माल नसल्याने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जूनअखेर संपलेल्या वर्षात चीनच्या १३६८ जहाजांना परत पाठविल्याचे वृत्त “डीपीए’ या संस्थेने दिले आहे. त्यामध्ये अन्नपदार्थांचा समावेश होता. (अमेरिकेने भारताच्या १७६३ जहाजांना परत पाठविल्याचे या वृत्तात म्हटले आहे.)

अमेरिकेच्या पाठोपाठ युरोपीय समुदायही (ईयू) चीनच्या उत्पादनांबद्दल साशंक बनला आहे. आपल्या उत्पादनांबद्दल चीनने दक्षता पाळावी आणि उत्पादनांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन युरोपियन समुदायाने चीनला केल्याचे वृत्त “इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्युन’ने प्रसिद्ध केले आहे. चिनी बनावटीच्या खेळण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा “ईयू’ने उपस्थित केला आहे. युरोपीय समुदायातील २७ देशांमध्ये गेल्या वर्षभरात ९२४ उत्पादने “असुरक्षित’ आढळली. लायटरपासून स्ट्रॉलरपर्यंत आणि खेळण्यांपासून किटल्यांपर्यंतच्या उत्पादनांचा त्यात समावेश आहे. यांपैकी बहुतेक उत्पादने चीनमध्ये बनविलेली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चीनची उत्पादने चिंताजनक ठरतात, असे “ईयू’चे ग्राहक आयुक्त मॅग्लेना कुनेव्हा यांनी म्हटले आहे. चीनची खेळणी आणि छोट्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू युरोपियन समुदायातील बहुतांश देशांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

चिनी उत्पादनांबद्दल अमेरिकेत निदर्शने होत असली तरी तेथील अनेकांना या उत्पादनांशिवाय जगणेच अवघड बनेल; कारण ती अगदी सहजपणे कोठेही मिळू शकतात, असेही मत व्यक्त केले जात आहे. सारा बॉंजिरोनी या पत्रकार महिलेने “ए इयर विदाऊट “मेड इन चायना’ हे पुस्तक लिहिले आहे. कोणत्याही परिस्थितीत चिनी उत्पादने विकत घ्यायची नाहीत, असा निर्धार तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. त्यानंतर जो अनुभव आला, त्याचे कथन तिने या पुस्तकात केले आहे. या पुस्तकात तिने नमूद केले आहे ः “”चिनी उत्पादनांशिवाय राहणे अशक्‍य नाही; परंतु ते अवघड आहे. कारण सेल फोनपासून पिचकारीपर्यंतची अनेक उत्पादने चिनी बनावटीचीच आहेत. कोणी सांगावे, एखाद्या दिवशी टीव्हीही फक्त चिनी बनावटीचाच असेल. माझ्या मुलाला टेनिस शूज घ्यायचे होते. चिनी बनावटीचे शूज दहा ते पंधरा डॉलरला होते; मात्र ते घ्यायचे नसल्याने सत्तर डॉलर खर्चून अमेरिकी बनावटीचे शूज घ्यावे लागले.”

“मेड इन चायना’ असलेल्या वस्तू न घेण्याचे तिचे कारणही वेगळे आहे. अलीकडेच लिहिलेल्या एका लेखात तिने म्हटले आहे ः “”चिनी तरुणांमुळे अमेरिकेतील तरुणांच्या नोकऱ्या कमी होत असल्याने किंवा चीनने तिबेट घशात घातल्यामुळे हा निर्णय घेतला नाही. हा निर्णय वैयक्तिक स्वरूपाचा होता. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. टी शर्टपासून फ्रूट ज्यूसपर्यंत सर्वच वस्तू चीनच्या असतील, तर चिनी वस्तूंची ही बाजारपेठ किती मोठी आहे आणि चिनी वस्तूंशिवाय खरेदी करता येते काय, हे पाहण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”

बॉंजिरोनी यांचा हा अनुभव बोलका आहे. म्हणूनच अमेरिकेच्या सुमारे नऊ हजार अब्ज डॉलरच्या बाजारपेठेसाठी गेल्या वर्षी चीनने २९० अब्ज डॉलरच्या उत्पादनांची निर्यात केली. “मेड इन चायना’ चर्चेत आहे ते अशा अनेक बाबींमुळे!

Advertisements

~ by manatala on जुलै 31, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: