आरोग्याचे “पॅकेजिंग’ जिम!

gym.jpg
दैनंदिन जीवनात येणारे ताणतणाव सुसह्य करण्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे “जिम्नॅशिअम’ ऊर्फ “जिम.’ त्याकडे वळणाऱ्या पावलांची संख्या वाढत असल्यामुळे जिम आता आपल्या आयुष्याचा एक भागच होऊ पाहत आहेत. मॉल, मल्टिफ्लेक्‍स यांच्याबरोबरच आधुनिक उपकरणांनी सुसज्ज “जिम’ही आता वाढत आहेत. ………
वातानुकूलित दालन, व्यायामाची अत्याधुनिक उपकरणे, व्यायाम करताना लावले जाणारे संगीत, स्वीमिंग पूल तसेच योगा, ऍरोबिक्‍स, ऍब्ज, मसाज, स्पा, रेस्टॉरंट आदी सुविधा म्हणजे जिम, अशी संकल्पना आता उदयाला येत आहे. त्यामुळेच “सोलारीस’, “डेफिनेशन’, “गोल्ड’, “एन्ड्यूरन्स’, “ऍब्ज’ अशा नावांच्या अत्याधुनिक व्यायामशाळांचे (!) अस्तित्व दिसू लागले आहे.
उच्चभ्रू वर्गाबरोबरच मध्यमवर्गीयही आता त्यात दिसू लागले आहेत. पाच हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागा असलेल्या जिमची संख्या पुण्यात वाढती आहे. सध्या पाच-सहा जिमचे बांधकाम चालू आहे. तालीम, आखाडे यांच्यानंतर व्यायामशाळा अस्तित्वात आल्या व अजूनही त्या आपले वेगळेपण टिकवून आहेत. मात्र, त्याचा वापर व तेथे येणारे यांची संख्या मर्यादित आहे. त्यानंतर क्‍लब आले. पहाटे “जॉगिंग’ करणारे किंवा “मॉर्निंग वॉक’ घेणारे तेथे जाऊ लागले. युवकांबरोबरच काही प्रमाणात नोकरदार आणि व्यावसायिक वर्ग तेथे पोचला. महिलांसाठी तेथे स्वतंत्र बॅच होती. आता या पुढची पायरी आली आहे. व्यायाम करताना वातानुकूलन दालन, प्रशिक्षित ट्रेनर आणि आधुनिक उपकरणे यांचे युग आले आहे. महिला आणि पुरुष असा भेद तेथे होत नाही. अशा प्रकारच्या जिम गेल्या दीड- दोन वर्षांत सुरू झाल्या. त्यांना अपेक्षित असलेले आर्थिक उद्दिष्ट त्यांनी केव्हाच पूर्ण केले, यावरून त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात येतो. आरोग्यासाठी वर्षाला किमान आठ-दहा हजार रुपये खर्च करण्याचीही मानसिकता निर्माण होत आहे. अन्‌ महत्त्वाचे म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत या जिममध्ये वर्दळ असते. सकाळी अकरा ते दुपारी तीन हे “हॅपी अवर्स’सही त्यास अपवाद नाहीत.

या बाबत निरीक्षण नोंदविताना “डेफिनेशन’चे संचालक चिराग जैन म्हणाले, “”लोकांच्या राहणीमानात वेगाने सुधारणा होत आहे. चित्रपट बघण्यासाठी ते मल्टिफ्लेक्‍सची निवड करतात. “एसी’ हॉटेलमध्ये प्राधान्याने जातात. तशीच त्यांची आता जिमबद्दलही अपेक्षा आहे. त्या लक्षात घेऊनच व्यायामाचे “पॅकेजिंग’ सुरू झाले आहे. एकाच ठिकाणी परिपूर्ण व्यायाम सुविधा देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहेत. व्यायामाबद्दलची जागरूकता वाढती असून आता गृहिणीही जिममध्ये येऊ लागल्या आहेत.”

व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तिने कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा, हे येथील प्रशिक्षकाकडून ठरविले जाते. हे प्रशिक्षक तयार करण्यासाठी शहरात तीन-चार अकादमीही निर्माण झाल्या आहेत. त्यातून पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.

जिममध्ये येणाऱ्यांनी व्यायामासाठी अगदी ४० मिनिटे जरी दिली, तरी त्यांना “सर्किट ट्रेनिंग’ पद्धतीनुसार सर्व प्रकारचा व्यायाम देण्याची व्यवस्था “सोलारीस’ने केली आहे. काहींकडे व्यायामासाठी वेळ कमी असतो. अशा ग्राहकांना जास्तीत जास्त व्यायाम प्रकार कमी वेळात; परंतु शास्त्रीयदृष्ट्या अचूक पद्धतीने देण्याचा प्रयत्न असल्याचे संचालक जयंत पवार यांनी सांगितले. “फिटनेस टाऊन’ ही त्यांची संकल्पना आहे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्त्व चहुबाजूने नागरिकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे त्यासाठी थोडेसे जादा पैसे मोजायलाही ते तयार आहेत. म्हणूनच आगामी काळातही आधुनिक जिमची संख्या वाढतीच राहणार असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

भारतातील आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता परदेशातील कंपन्यांच्याही लक्षात येत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय साखळी असलेली “गोल्ड’ जिमही शहरात नुकतीच दाखल झाली आहे. विशिष्ट वर्गातीलच ग्राहकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. “गोल्ड’ची आंतरराष्ट्रीय साखळी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक केंद्रात साम्य आहे. उपकरणांची गर्दी झाली तरी चालेल; पण व्यायाम करणाऱ्यांना गर्दी वाटायला नको, यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे संचालिका पायल भारतिया यांच्याशी बोलताना जाणवले. व्यायाम करताना, वातावरणही महत्त्वाचे असते. येथे येणारा ग्राहक ज्या वर्गातील तसे त्याला वातावरण द्यायला हवा. त्यामुळेच पार्किंगला पुरेशी जागा, रेस्टॉरंट यावरही आम्हाला लक्ष द्यावे लागते, असे त्यांनी नमूद केले.

अशा प्रकारच्या जिममधून “सोशल गॅदरिंग’ही होत आहे. त्यातून ट्रेक, गेट-टू-गेदर, संडे ग्रुप अशा संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या आहेत. शहरीकरणाच्या नव्या रचनेतील “जिम’ केवळ युवकांनाच नव्हे तर, अन्य वयोगटालाही आता भुरळ घालत आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी एखाद्या जिममध्ये चक्कर मारायलाच हवी!

Advertisements

~ by manatala on जुलै 31, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: