पराठ्यांच्या चवीचे रहस्य
पनीर, चीझ, मेथी, मशरुम, ग्रीन पिझ्झा असे पराठ्यांचे दहा-बारा नव्हे, तब्बल ७० प्रकार ही रुचिराज जस्ट पराठा हॉटेलची खासियत. इथला दिल्ली चाट तर बेस्टच. टोकरी चाट, पापडी चाट, समोसा चाट जिभेला तृप्त करतात. दिल्ली दी जान म्हणून फेमस असलेल्या छोले भटुरेचे ३५ वेगवेगळे प्रकार इथं टेस्ट करायला मिळतात. इथली पाणीपुरी तर तोंडात टाकताच विरघळणारी. उत्तरेतील या डिशेस नको असेल, तर अस्सल मराठमोळ्या चवीची थाळी, तीही केळीच्या पानावर आणि सर्वांच्याच आवडत्या मोदक, नारळाच्या वड्या आणि थालिपिठासह… आहे की नाही कोणत्याही खवय्याला आकषिर्त करणारी मेजवानी.
नौपाड्यातील घंटाळी मैदानाजवळ असलेले हॉटेल रुचिराज जस्ट पराठा गेले सहा महिने खवय्यांच्या जिभेचे चोचले अत्यंत प्रेमाने पुरवत आहे. रमलेल्या संगीता रामदास मगर यांनी सहा महिन्यांपूवीर् घंटाळीतील जस्ट पराठा हे हॉटेल ताब्यात घेतले आणि त्याचे नामकरण रुचिराज जस्ट पराठा केले. त्यानंतर अल्पवधीतच ते ठाणेकरांच्या पसंतीत उतरले आहे. येणाऱ्या खवय्यांची टेस्ट जाणून घेणे, तसेच त्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे बदल करण्यात त्या सदैव उत्सुक असतात.
पराठ्यांच्या चवीचे रहस्य त्याच्या आतील स्टफिंगमध्ये दडलेले असते. हे स्टफिंगच आमची खासियत असल्याचं त्या सांगतात. पराठ्यासोबत सुकलेले आवळे घालून केलेले छोलेची चटणी तर लाजवाबच. मूगडाळ, शेंगदाणे, कुरमुरे आणि दही घालून केलेले दिल्ली चाटही खवय्यांना अक्षरश: वेड लावते. उपवासाच्या स्पेशल थालीचा मेन्यू ठरविण्यात संगीता मगर आणि त्यांचे पती रामदास सध्या गुंतलेले आहेत. ही श्रावणातली थाळी सर्वांपेक्षा हटके असेल असं हे दाम्पत्य सांगतं
– खमंग आचारी