ऐसी अक्षरे!

परवा साध्या स्केचबुकसाठी दुकानात उचकापाचक करताना अचानक कॅलिग्राफीच्या कटनिब आणि बोरू असा सगळा सेट दिसला. परत कॅलिग्राफी सुरू करायची आहे असं म्हणूनपण आता युगं लोटलेली. पण समोर ते सगळं पाहताच सेपिया मोडमधल्या दिवसांची दाटी झाली.टोकदार पेन्सिलींनी अक्षर कोरून काढायचे दिवस ते गळणार्‍‍या पेनांनी रंगणारी बोटं सांभाळत लिहायचे दिवस,
दर रविवारी शाईनी बरबटलेली पेनं सारे भाग सुटे सुटे करत साफ करायचे दिवस,
रेनॉल्ड्च्या त्या फिक्कट निळ्या पेनापासून ते अगदी ‘Made in China’ वाल्या सोनेरी टोपणाच्या हिरो पेनापर्यंत प्रगती केलेले दिवस.

अशाच कुठ्ल्यातरी दिवसात कटनिबचं खूळ (अर्थातच आईच्या मते ‘खूळ’, आमच्यामते सुलेखनाचे प्रयत्न!) डोक्यात शिरलेलं. अर्थात त्या दिवसात पॉइंटेड छानसं पेन आणि लेदर कव्हर असलेली डायरी या अशा गोष्टींसाठी आईकडे हट्ट करताना हा एक नवीन हट्ट.
कुणातरी मैत्रिणीनं आपल्या नव्या कोर्‍या वहीत पहिल्या पानावर नाव लिहून घेतलेलं आपल्या भावाकडून ( असले सगळे भाऊ, हे भयंकर हुश्शार आणि बेक्कार माज करायचे ,आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मस्तपैकी राबवून घ्यायचे त्या काळी!!) ते ट्पोर्‍या अक्षरातलं नाव बघून मला माझ्या वही-अक्षर जे काय असेल त्या सगळ्याची कीव यायला लागली. मग आम्हीही त्या बंधुराजांचा मॅड्सारखा पिच्छा पुरवून कटनिब पैदा केल्या आणि काय असतील ते प्रयोग सुरू केले. काही दिवस अगदी उत्साहानं केलेले प्रयोग अर्थातच थंडावले पुढं आणि परत एकदा ‘बॉलपेन झिंदाबाद’ मोहिमेत आम्ही सामील. ( आईच्या भाषेत नव्याचे नऊ दिवस करून झाले!)

हं.. इतकं सारं आठवलं ते बघताना आणि परत एकदा त्या वेडानं मात केली. त्याची परिणती तो अख्खा संच घेऊन येण्यात झाली. आता जे काही आणलेलं ते आधी केलेल्या कशाशीही साधर्म्य दाखवत नव्हतं. एकतर आधी कटनिब नेहमीच्या शाईपेनात बसवायची असल्याने बाकी काहीच लागायचं नाही. पण या सार्‍या आधुनिक मामल्यात जो बोरू होता तो शाईत दर २ सेकंदानी बुडवा, त्या नकट्या नाकाच्या निबला सांभाळत लिहायचा प्रयत्न करत रहा. आणि या कसरतीत ग्रेसची कविता लिहा (करा अजून उपद्व्याप आणि भोगा आपल्या कर्माची फळं!)

मराठी लिपीतले असंख्य आकार- उकार दमछाक करवत होते. साधं ‘अ’ घ्या, एक अर्धगोल, त्याला आणि एक अर्धगोल जोडा मग आडवी दांडी त्याला एक जोडून एक काना आणि या सगळ्याला आपल्या छ्त्रछायेखाली घेणारी एक शिरोरेषा. हुश्श.. पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा अक्षरं गिरवताना ‘अ’ काढताना नक्की काय वाटलं होतं ते काही आठवत नाहीये. पण आईनं गिरवून घेतल्यावर तिला काय वाटलं असेल ते थोडं फार जाणवलं. प्रत्येक अक्षरावर धडपडत अख्खी कविता पूर्ण केली तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.

म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात – परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. शेवटी अक्षर म्हणजे तरी काय, कुणासाठी भावनांना मूर्तरूप देण्याचं माध्यम, कुणासाठी कलेची अभिव्यक्ती तर कुणासाठी फक्त रेघोट्यांचा खेळ!

Advertisements

~ by manatala on जुलै 30, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: