स्वयंपाकाची सिद्धता

उत्कट भव्य तितुके घ्यावे। मळमळीत अवघेचि टाकावे।’ हे समर्थांच्या जीवनाचे सूत्र होते. अस्वच्छता, बावळटपणा, वेंधळेपणा याची त्यांना चीड होती. अशा धसमुसळ्या माणसाबद्दल ते लिहितात- ”एखादे माणूस ते शिळे। त्याचे अवघे करणेचि बावळे।” समर्थ हे सौंदर्याचे पुजारी होते. चाफळच्या राममंदिरातील भोजन प्रसंगाचे वर्णन करताना आधी ते मंदिराचे वर्णन करतात. आपल्या मनात मंदिर म्हटले की दक्षिणा मागणारे अथवा पैशासाठी भंडावून सोडणारे पुजारी येतात; पण समर्थांची मंदिर ही संकल्पना अतिशय उदात्त होती. अंगण झाडले आहे, सडा-संमार्जन झाले आहे, रांगोळ्यांचे सुंदर रंगीबेरंगी नक्षीकाम दिसते आहे. आत दीपमाळांची आरास तेवत आहे. मंदिराजवळील पुष्पवाटिकेत मनोहर ब्रह्माकमळे विकसित झाली आहेत. गोशाळेत गाई-वासरांना पाजत आहेत. एखादे हरीण, एखादा ससा बागेत धावताना दिसतो आहे. बागेतील झाडांवर कोकीळेचे कुजन सुरू आहे. मंदिरातील हे वातावरण पाहून कोणाचे चित्त प्रसन्न होणार नाही?

दुसऱ्या प्रकरणात समर्थ मंदिरातील सेवकवर्ग आणि अधिकारीवर्ग यांचे वर्णन करतात. सेवकवर्ग दिसायला सुंदर, अत्यंत चतुर, मनाने उदार, दूरदृष्टी असलेला, धैर्यशाली आणि मधुरवचनी आहे. मंदिरात भोजनासाठी आलेल्या भक्तांना ते अत्यंत आदराने विचारपूस करून मार्गदर्शन करतात. सेवकवर्गाच्या हातून कधीही चुका होत नाहीत.

तिसऱ्या प्रकरणात समर्थ स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांचे वर्णन करतात. या सर्व स्त्रिया जणू प्रत्यक्ष उमा, रमा असून त्या नेटक्या सुगरणी आहेत. त्या स्वयंपाकात इतक्या कुशल आहेत की, त्यांच्या हातचे अन्न खाऊन आजारी माणूसदेखील बरा होईल. पानावर बसलेला मनुष्य पानात काही टाकणार तर नाहीच; पण ताट-वाटी व्यवस्थित चाटून घेईल.

चौथ्या प्रकरणात स्वयंपाकासाठी वापरलेल्या भाज्यांची आणि कोशिंबिऱ्यांची फार मोठी यादी दिली आहे. ही यादी पाहिली म्हणजे समर्थांच्या शब्दसार्मथ्याची कल्पना येते. लोणची, रायती, वडे, पापड, मेतकूट, दही, दूध, ताक, लोणी, दाट साय, लिंबं, हिंग, जिरे, मिरे, मेथ्या, मोहरी, दोण, पत्रावळी, दुरड्या ही सर्व सामग्री अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध असून स्वयंपाकघरात आल्यावर पदार्थाचे शुद्ध स्वरूप पाहून माणसांचे डोळे तृप्त होतात; तर शिजत असलेल्या पदार्थांच्या वासाने घ्राणेंदिये तृप्त होतात.

पाचव्या प्रकरणात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची यादी आहे. रांजण, डेरे, मडकी, घागरी, तवे, आडगरी, हंडे, तपेली, पाळी, ताम्हन, चरव्या, घंघाळी, वेळपाळी, झाऱ्या, पळ्या, पाटा-वरवंटा, पोळपाट-लाटणी ही सगळी पात्रे असून स्वच्छ घासल्यामुळे ती चकाकत आहेत. पिण्याचे पाणी व्यवस्थित गाळून भरले आहे. काही मंदिरांमध्ये स्वयंपाकघर आणि तेथील भांडी पाहिली म्हणजे प्रसाद म्हणूनसुद्धा जेवण घ्यावेसे वाटत नाही.

सहाव्या आणि सातव्या प्रकरणात प्रत्यक्ष स्वयंपाकाचे वर्णन असून कणिकेचे ढीग तिंबणे, प्रचंड पुरण वाटणे, तेला-तुपाच्या सणसणीत फोडण्या, नाना प्रकारचे तेलकट तुपकट पदार्थ आणि त्यांचा दरवळणारा सुगंध यांचे वर्णन आहे. तूप तर अक्षरश: दोणाने वाढले जात आहे. विशेष म्हणजे भोजनाला बसण्यापूवीर् तयार केलेले पदार्थ भगवंतासमोर ठेवून त्याला नैवेद्य दाखवला आहे. त्यानंतर शेवटच्या प्रकरणात प्रत्यक्ष भोजनाचे वर्णन आहे.

स्नान करून आणि स्वच्छ वस्त्रं परिधान करून माणसे जेवायला बसली आहेत. त्यांच्या ताटांमध्ये विविध पदार्थांची दाटी झाली आहे; कारण सगळे पदार्थ वाटल्याशिवाय कोणीही जेवायला सुरुवात करीत नाही. गुरुजींनी संकल्प सोडल्यावर भगवंताचे नाम आणि विविध श्लोक यांचा जयघोष होतो आहे. आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड अशा विविध पदार्थांवर लोक तुटून पडले आहेत. काही माणसे डावा हात जमिनीवर टेकवून जेवत आहेत. जेवण चालू असतानाचा फरफर आणि फुरफूर आवाज नोंदवायला समर्थ विसरले नाहीत. जेवणाच्या शेवटी ढेकर, उचक्या आणि गुचक्या यांचे आवाजदेखील ऐकू येतात. ‘ढेकर देती डरारा। सावकास।।’ असे समर्थ लिहितात यावरून सगळ्यांचे आकंठ भोजन झालेले दिसते.

भोजनानंतर पान, सुपारी, चुना, कात, पत्री, लवंग, कंकोळ आदी सर्व सामग्री पहायला मिळते. भोजनाने तृप्त झालेले लोक अन्नपचनासाठी अथवा मुखशुद्धी म्हणून विडा भक्षण करतात. भोजन झाल्यानंतर सारेजण मंदिरात पुन्हा भगवंताचे दर्शन घेतात. भगवंत हा अन्नदाता असल्यामुळे त्याचा जयघोष करून सारेजण घरी परततात.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: