समर्थ आणि बुद्धिप्रामाण्यवाद

आजचे युग विज्ञानाचे अथवा संगणकाचे असल्यामुळे, तसेच आजची शिक्षणपद्धती तर्काधिष्ठित असल्यामुळे बुद्धिप्रामाण्याला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याकडे तरुणांचा कल असतो. एकेकाळी पौराणिक कथांनी चारित्र्यनिमिर्तीचे कार्य उत्तम पद्धतीने केले, परंतु आजचा तरुण पौराणिक कथेमध्ये रमू शकणार नाही. बुद्धिप्रामाण्यवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वत:ची विचारशक्ती वापरणे या सर्व गोष्टींना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयात आपल्याला जागोजागी बुद्धियोग पाहायला मिळतो. भोळसटपणामुळे माणसे एखाद्या बुवाच्या नादी लागून देव देव करीत राहतात. समर्थांना ही गोष्ट मान्य नाही. ते म्हणतात-

जितुका काही भोळा भाव। तितुका अज्ञानाचा स्वभाव।

अज्ञाने तरी देवधिदेव। पाविजेत नाही।।

उदंडांचे उदंड ऐकावे। परि अंतरी प्रत्यये पहावे।

खरे खोटे निवडावे। अंतर्यामी।।

दुदैर्वाने आजदेखील शिकली सवरलेली माणसे भाबडेपणाने अध्यात्माच्या नावाखाली चुकीच्या मार्गाचे अनुसरण करताना दिसतात. समर्थांनी सतराव्या शतकात बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार केला. केवळ व्यावहारिक क्षेत्रातच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्रातदेखील माणसाने बुद्धियोगी असले पाहिजे असे समर्थांचे स्पष्ट मत होते. श्रीमद् दासबोधाची शब्दसूची आणि विषयसूची तयार करण्यात आली, तेव्हा असे आढळले की विवेक आणि विचार हे दोन शब्द दासबोधात सर्वात जास्त वेळ वापरले गेले असून या दोन विषयांच्या ओव्या सर्वात जास्त आहेत. ‘उदंड करावे पाठांतर। सन्निधची असावा विचार। किंवा ‘ग्रंथ मात्र धांडोळावा।’ किंवा ‘शब्द रत्ने परिक्षावी।’ किंवा ‘बुद्धिवीण माणूस काचे।’ अथवा ‘घालून अकलेचा पवाड। व्हावे ब्रह्माांडाहूनि जाड।’ अशा प्रकारची शेकडो अवतरणे समर्थांच्या ग्रंथातून काढता येतील. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच केली पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीचा योग्य खुलासा आपल्याला करता आला पाहिजे.

खेड्यापाड्यामध्ये आजही देवीच्या नावाने गळफासाचा नवस करणे, निखाऱ्यावरून चालणे, जिभेला छिद पाडून लाकडाचा तुकडा घालणे, मशालीने अंग भाजणे, देवाला मस्तक वाहणे, मूल बळी देणे, अशा अनेक गोष्टी भक्ती म्हणून केल्या जातात. समर्थांनी या सर्व गोष्टी तमोगुण म्हणून निषिद्ध मानल्या आहेत. नखे, केस वाढविणे, कडकडीत उपवास करणे या गोष्टी समर्थ त्याज्य मानतात. प्रापंचिक माणसाने साधना करताना देहाला फाजील कष्ट देणे किंवा देहाकडे दुर्लक्ष करणे समर्थांना मान्य नाही. नरदेह म्हणजे तर भगवंताचे निवासस्थान होय. एक गोष्ट खरी की देहाचे फार चोचले पुरवू नयेत. अथवा इंदियांचे फार लाड करू नयेत. पण त्याचबरोबर देहाची फार हेळसांडही करू नये. विशिष्ट पद्धतीचे सुग्रास भोजन असावे असा आग्रह नको किंवा अजिबात अन्न ग्रहण करायचे नाही, असा कडक नेम नको. उद्ध्वस्त कुटुंबाचे वर्णन करताना नवसाने प्राप्त झालेली मुले पुढे आई-वडिलांनाच मारतात, असे म्हणून समर्थांनी नवसाची निर्र्भत्सना केली आहे.

मृत्यूसंबंधी काही लोकांची अशी कल्पना असते की काशी क्षेत्री मरण येणे चांगले किंवा उत्तरायणात मरण यावे, शुद्ध पक्षात आलेले मरण चांगले, वद्य पक्षातील मरण वाईट, दारात मरण आले तर चांगले, घराबाहेर मरण आले तर वाईट. समर्थांनी या सर्व कल्पना उडवून लावल्या आहेत. ते म्हणतात-

जनाचे विपरीत मत। अंती भेटतो भगवंत।

ऐसे कल्पून घात। करीती आपुला स्वये।।

जिता सार्थक नाही केले। वेर्थ आयुष्य निघोनी गेले।

मुळी धान्यचि नाही पेरिले। ते उगवेल कैसे।।

जो मनुष्य आयुष्यभर सदाचाराने वागतो आणि भगवंताची भक्ती करतो त्याचे मरण वद्य पक्षात येवो अथवा दक्षिणायनामध्ये येवो, आपल्या सत्कर्मामुळे तो मुक्त होतो. पुढच्या जन्मी मोक्ष मिळेल म्हणून दान करणाऱ्या माणसाला समर्थांनी मोडीत काढले आहे. श्राद्ध-पक्ष समयी मेलेली माणसे जेवायला येतात, याला त्यांनी भ्रम म्हटले आहे.

सद्गुरूंविषयी समर्थांचा कटाक्ष होता. दांभिक गुरूला ते अधमाहून अधम चोर म्हणतात. ‘जन स्वभाव गोसावी’ या स्फुट कवितेत चमत्कार करणाऱ्या बुवांची समर्थांनी खिल्ली उडविली आहे. पारमाथिर्क जीवनात माणसाने गुरू तपासून घ्यावा असे ते म्हणतात. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांचा गुरू म्हणून स्वीकार करताना त्यांची अनेकदा परीक्षा घेतली होती.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: