समर्थांच्या आरत्या

आरती हा शब्द ‘आर्त’ या शब्दापासून तयार झाला आहे. पूजेच्या शेवटी भगवंतांच्या गुणांचे केलेले गायन म्हणजे आरती होय. भक्त जेव्हा भगवंताची पूजा करतो, तेव्हा त्याचे अंत:करण दाटून येते. भगवद्प्रेमाने अंत:करणात आर्तता निर्माण होते. या अवस्थेत केलेल्या गायनाला आरती असे म्हणतात. ‘रती’ याचा अर्थ प्रेम. ‘आ’ म्हणजे आत्यंतिक. भगवंताबद्दलचे आत्यंतिक प्रेम असादेखील आरती शब्दाचा अर्थ लावला जातो.

आरती म्हटले की समर्थ रामदासच डोळ्यासमोर उभे राहतात. कारण आपण नेहमी म्हणतो त्यातील बहुतांश लोकप्रिय आरत्या समर्थ रामदासांनी रचल्या आहेत. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती अथवा ‘दुगेर् दुर्घट भारी’ ही देवीची आरती, तसेच ‘लवथवती विक्राळा’ ही शंकराची आरती समर्थांनी रचलेली आहे. समर्थ हनुमंताचे विशेष भक्त असल्यामुळे ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही त्यांनी रचलेली हनुमंताची आरती खूप प्रसिद्ध झाली. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या नावाने अंबाबाईचा जो उदो बोलला जातो हीदेखील समर्थांचीच रचना आहे.

समर्थांनी काकड आरती, भूपाळ्या, शेजारती असे आरतीचे अनेक प्रकार लिहिले. भगवंताला झोपेतून उठवणे आणि भगवंताला पलंगावर झोपवणे ही कल्पनाच किती मधुर आहे! भक्तीमध्ये ही रसिकता आमच्या संतांनी निर्माण केली. समर्थांच्या आरत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभू रामचंद, महावीर हनुमान, तुळजाभवानी, महाकाली, दशावतार, सूर्यनाराण, काळभैरव, व्यंकटेश, खंडेराव, विठ्ठल, गणपती, महालक्ष्मी, शांतादुर्गा, शंकर, केदारनाथ, दत्तात्रेय अशा अनेक देवतांच्या आरत्या त्यांनी केल्या. एवढेच नव्हे तर आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची आरती लिहिली. याखेरीज संतांची आरती नावाचे स्वतंत्र कवन असून त्यात ज्ञानेश्वरादी चारही भावंडे, चोखामेळा, गोराकुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, तुकाराम महाराज या सर्व संतांना समर्थांनी वंदन केले आहे. तुकाराम महाराज हे समर्थांना समकालीन असूनही त्यांचा अंतर्भाव आरतीत केला आहे. कृष्णा नदी समर्थांची अत्यंत लाडकी. स्वत:ला कृष्णातीरवासी म्हणवून घेण्यात समर्थांना भूषण वाटते. त्या कृष्णाबाईची आरतीदेखील समर्थांनी लिहिली आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णाबाईच्या उत्सवात माहुली, वाई, कराड, महाबळेश्वर या सर्व ठिकाणी कृष्णाबाईची आरती मोठ्या श्रद्धेने म्हटली जाते. एखाद्या नदीची आरती करण्यात कवीची निसर्गप्रीती दिसून येते.

आपल्याकडे आरती म्हणताना फार घिसाडघाई केली जाते. त्यामुळे अनेकदा आरतीच्या अर्थाकडे लक्ष दिले जात नाही. भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे. तेव्हा त्यात अर्थाचा अनर्थ झाला तरी चालेल अशीच काही लोकांची धारणा असते. त्यामुळे गणपतीच्या आरतीतील ‘वार्ता विघ्नाची नुरवी’ म्हणजे विघ्नाचे निवारण करतो आणि ‘पुरवी प्रेम’ ही गणपतीची कृपा लक्षात घेतली जात नाही. गणपतीच्या आरतीत शेवटी समर्थांनी ‘संकटी पावावे’ असे म्हटले आहे. पण अनेक गणेशभक्तांनी संकटीच्या ऐवजी ‘संकष्टी’ असा शब्दप्रयोग केला आहे. बहुधा संकष्टी चतुथीर्वरून मूळ ‘संकटी’ शब्दाचा अपभ्रंश झालेला दिसतो. देवीची आरती म्हणताना तर भक्तमंडळी विनोदच करीत असतात. ‘दुगेर् दुर्घट भारी’ या आरतीचे पहिले कडवे पुढीलप्रमाणे आहे-

त्रिभुवनी भुवनी पहातां तुज ऐसी नाही।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही।’

साही विवाद करता पडिले प्रवाही।

ती तू भक्तालागी पाविसी लवलाही।।’ आरती म्हणताना सगळेजण ‘तुज ऐसे नाही’ तसेच ‘ते तू भक्तालागी’ असे म्हणतात. देवीचे वर्णन असल्यामुळे समर्थांनी स्त्रीलिंगी शब्दप्रयोग केले आहेत.

समर्थांच्या आरत्यांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे काही काही देवांच्या एका आरतीने त्यांचे समाधान झाले नाही. श्रीराम आणि हनुमान यांच्या सुमारे ४३ आरत्या समर्थांनी केल्या आहेत. गणपती, शंकर, भैरव यांच्यादेखील तीन/तीन, चार/चार आरत्या केल्या आहेत. नद्यांमध्ये ज्याप्रमाणे कृष्णाबाईची आरती केली, त्याचप्रमाणे ग्रंथांमध्ये भगवद्गीतेची आरती केली आहे. या आरतीत पहिल्या कडव्यात पहिल्या अध्यायाचा सारांश आला आहे; तर दुसऱ्या कडव्यात दुसऱ्या अध्यायाचा सारांश आहे. नंतरच्या तीन कडव्यांत मात्र भगवद्गीतेची स्तुती आहे. समर्थांनी भगवद्गीतेची केलेली आरती पाहून कल्याणस्वामींना प्रेरणा मिळाली व त्यांनी श्रीमद्दासबोधाची आरती केली. समर्थांच्या विविध शिष्यांनी समर्थांच्या निर्याणानंतर समर्थांच्या आरत्या लिहिल्या. समर्थकृत ज्ञानेश्वरांची आरती गोरठे येथील दासगणू महाराजांच्या मंदिरात नित्य म्हटली जाते.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: