समर्थांचे व्यवस्थापन

व्यवस्थापन आणि नियोजन हे नव्या युगाचे परवलीचे शब्द झाले आहेत. महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे अभ्यासक्रम निघाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, समर्थांच्या वाङ्मयात या विविध गोष्टींची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त होतात. इंग्रजीमध्ये समर्थांच्या व्यवस्थापनावर अनेक ग्रंथ झाले असून, काही जणांनी समर्थांच्या व्यवस्थापनावर पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. खरे म्हणजे व्यवस्थापन हा अध्यात्माचा आत्मा आहे. दुदैर्वाने काही महाराज लोकांनी अध्यात्मात भोंगळपणा आणि भोळसटपणा याला खतपाणी घातले. त्यामुळे आपली तीर्थक्षेत्रे व्यवस्थापन शास्त्राचे शत्रू होऊन बसली आहेत. मात्र अलीकडे रामकृष्ण आश्रम, अरविंद आश्रम, चिन्मय मिशन, सनातन संस्था, डेरवणची शिवसृष्टी या संस्थांमध्ये अध्यात्म आणि व्यवस्थापन यांचा सुमधुर समन्वय पाहायला मिळतो.

वस्तुत: वाल्मिकी रामायणातील रामराज्य संकल्पना म्हणजे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. भगवद्गीतेतील सहावा अध्याय म्हणजे स्वत:च्या शरीराचे आणि मनाचे व्यवस्थापन आहे. एखादी व्यक्ती असो अथवा राष्ट्र असो, चार माणसांचे कुटुंब असो अथवा चार हजार माणसांचा कारखाना असो, प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही संस्था चालवायची झाली की, व्यवस्थापन आले. एखादा गायनाचा कार्यक्रम ठेवायचा म्हटले की, वाद्यवृंद, गानचमू, ध्वनिक्षेपक, व्यासपीठ, विद्युतझोत, श्रोत्यांची आसन व्यवस्था या सर्वांचे व्यवस्थापन करावे लागते. या व्यवस्थापनातील अनेक बारकावे समर्थ सांगून जातात. ते म्हणतात-

ऐक सदेवपणाचे लक्षण। रिकामा जावो नेदी येक क्षण।

हे एकप्रकारे वेळेचे व्यवस्थापनच आहे. दिवस कसा घालवायचा, याचे नियोजन रोज करायला हवे. कारण दिवस हा आयुष्याचा एक अंशच आहे. व्यर्थ बडबड करण्यात वेळ घालविणे हा एकप्रकारे शक्तीचा अपव्यय आहे. भगवंताने दिलेले आयुष्य मर्यादित आहे आणि साधावयाचे ध्येय अत्युच्च आहे. ज्या माणसाला वेळेचे व्यवस्थापन करता येत नाही, असा मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.

संघटना हा तर व्यवस्थापनाचा आत्मा आहे. राष्ट्र म्हणजे काही भूभाग नव्हे अथवा माणसांची जत्रा नव्हे. एका विचाराने आणि ध्येयाने प्रेरित असलेल्या माणसांच्या समुदायाला राष्ट्र म्हणतात. त्यादृष्टीने ‘बहुत लोक मेळवावे। ये विचारे भरावे।’ ही समर्थांची सूचना अत्यंत मौलिक आहे. संघटनेमध्ये अनुशासन असायला हवे. संस्थाप्रमुखाने एखाद्या गटाला जवळ करणे आणि एखाद्या गटाची सतत उपेक्षा करणे शहाणपणाचे नाही, ही अत्यंत महत्त्वाची सूचना समर्थ रामदास देतात. संघटना चालविताना किंवा कारखाना चालविताना काही उपदवी मंडळी असतात. अशा लोकांना काळजीपूर्वक हाताळण्याचे कौशल्य संघटनाप्रमुखाला साधले पाहिजे. ज्या लोकांच्या चुका झाल्या असतील, त्यांना क्षमा करून पुन्हा संघटनेत सामावून घ्यावे. संघटनेत आपापसात भांडणे चालू राहिली, तर बाहेरचे घरभेदी पुढारी त्याचा लाभ उठवितात. म्हणून समर्थ सांगतात-

श्रेष्ठी जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।

मग जाणावे फावले। गनिमांसी।।

सेवकधर्म’ या प्रकरणात समर्थांनी मालक-नोकर संबंधांवर खूप छान प्रकाश टाकला आहे. नोकराने मालकाशी एकनिष्ठ राहावे आणि मालकाने त्याचा संसार उघडा पडू देऊ नये. धरण आणि कालव्याद्वारे माणसाने पाण्याचे व्यवस्थापन करावे, ही समर्थांची सूचना आश्चर्यकारक आहे.

व्यवस्थापनात कामाचे वाटप फार महत्त्वाचे आहे. समर्थ म्हणतात-

लोक बहुत शोधावे। त्यांचे अधिकार जाणावे।

जाण जाणोनि धरावे। जवळी दुरी।।

नेतृत्व ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. प्रेरणा (द्वश्ाह्लद्ब१ड्डह्लद्बश्ाठ्ठ) देण्यासाठी कारखान्यात नेता असावा लागतो. नेत्याच्या पाठोपाठ अनुयायी प्राण द्यायला तयार होतात. समर्थांनी लोकसंग्रह आणि भ्रमण याला विलक्षण महत्त्व दिले आहे. जाहिरात आणि प्रचार साधण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. माणसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी विश्रांतीचे तास आणि कामाचे तास यांचे सुंदर नियोजन असावे, असे समर्थ सुचवितात. त्यासाठी ‘काही गलबला काही निवळ। ऐसा कंठित जावा काळ।’ असे ते म्हणतात. कारखाने प्रकरणात तर समर्थांनी कामगारांची भरती, कामाची वेळ, पगारवाटपाची पद्धती आदी गोष्टींचा बारीकसारीक विचार केला आहे. विटा कशा भाजाव्यात, हे सांगताना विटांची लांबी, रुंदी, जाडी यांची मापे समर्थ देतात. समर्थांसारख्या संतांचे हे व्यवहारचातुर्य थक्क करून टाकणारे आहे.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: