समर्थांचे पंचीकरण

समर्थांना पंचीकरणाचे मोठे आकर्षण. श्रीमद् दासबोधात तर जागोजागी पंचीकरणाचा विचार येतो. याखेरीज समर्थ वाङ्मयात पंचीकरण मथळ्याखाली अनेक अभंग, स्फुट समास अथवा प्रकरणं येऊन जातात. परमार्थात पंचीकरण किती महत्त्वाचे आहे हे समर्थांच्या पुढील ओवीवरून लक्षात येईल-

प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमाथीर् पंचीकरण।।

महावाक्याचे विवरण। करिता सुटे।।’

भीमस्वामी तंजावरकर यांना लिहिलेल्या पत्रात समर्थ म्हणतात- ‘प्रवृत्तीस पाहिजे राजकारण। निवृत्तीस पाहिजे पंचीकरण।।’

याचा अर्थ मोक्षासाठी पंचीकरण समजावून घेतले पाहिजे. आपले शरीर पंचभूतिक आहे. या शरीरात अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे वासनेचे पाच पदर आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे वासनेचे पाच विषय आहेत. शरीराद्वारे या विषयांचे सेवन करण्यासाठी भगवंताने माणसाला पाच ज्ञानेंदिये आणि पाच कमेर्न्दिये दिली. पंचमहाभूतं, अंत:करणपंचक, विषयपंचक, ज्ञानेंदिय पंचक आणि कमेर्ंदियपंचक यांच्या समूहाला समर्थ पंचीकरण म्हणतात.

समर्थांच्या मते पाचा पाचाचा हा पसारा हे काही आपले खरे स्वरूप नव्हे. आपले सारे अवयव आणि इंदिये, छोटे छोटे भाग (ह्यश्चड्डह्मद्ग श्चड्डह्मह्लह्य) असून हे सगळे जोडले जाऊन शरीर बनते. समर्थांनी शरीराचे आणखी पृथ:करण करून ८२ भाग सांगितले. उदा: ‘आप’ या महाभूताचे रक्त, लाळ, मूत्र, वीर्य, घाम असे आणखी विभाग केले. पृथ्वी या भूताचे हाड, मास, त्वचा, नाडी आणि रोम हे आणखी पाच भाग केले.

समर्थांच्या मते आपले शरीर म्हणजे अशा ८२ तत्त्वांचे गाठोडे आहे. यातील प्रत्येक तत्त्व जड म्हणजे अचेतन आहे. मग एक साधा विचार करा की ८२ जडतत्त्वांच्या आधारे हे शरीर बनले. त्यात चैतन्य कोणते? जर चैतन्य नसेल तर ८२ तत्त्वांचे हे गाठोडे कोणी बांधले? याचा अर्थ शरीर हे माझे खरे स्वरूप नसून चैतन्य हे माझे खरे स्वरूप आहे. मी म्हणजे चैतन्य असून इंदिय किंवा अवयव नाही. जीभ जड आहे, मग आंबट, तिखट, गोड ही चव कोणाला कळली? त्वचा जर जड आहे तर गार, गरम, मऊ, टणक हे ज्ञान कोणाला झाले? अलीकडे माणसे मृत्यूनंतर नेत्रदान करतात. मेलेला मनुष्य मृत्यूनंतर डोळ्यांनी पाहू शकत नाही. मात्र मेलेल्या माणसाचे तेच डोळे शस्त्रक्रियेद्वारा जिवंत माणसाला रोपण केल्यास तो माणूस मात्र त्या डोळ्यांनी पाहू शकतो. याचा अर्थ केवळ डोळे पाहत नाहीत, तर पाहणारा कोणीतरी वेगळा असला पाहिजे. आपण झोपतो तेव्हा कान उघडे असूनही आपल्याला बाहेरचे आवाज ऐकू येत नाहीत. याचा अर्थ, केवळ कान ऐकत नसून ऐकणारा कुणीतरी वेगळा आहे. हा ऐकणारा कोण आहे? हा पाहणारा कोण आहे? त्याचा शोध घ्या.

समर्थ पंचीकरणाची मांडणी फार तर्कशुद्ध पद्धतीने करतात. ते म्हणतात की आपण ‘माझे शरीर’ असे म्हणतो. म्हणजेच ‘मी’ म्हणजे मन नव्हे. मग ‘मी’ म्हणजे नेमका कोण. याचा शोध घेतला पाहिजे. या शोध घेण्याच्या प्रक्रियेला समर्थ पंचीकरण असे म्हणतात. शोध घेता घेता माणसाच्या लक्षात येते की ज्याप्रमाणे सगळी उपकरणे विजेवर चालतात आणि वीज बंद पडताच सगळी उपकरणे बंद पडतात. त्याप्रमाणे चैतन्याशी जोडली गेली आहेत तोपर्यंत ही ८२ तत्त्वे कार्यरत राहतात. घड्याळातील सेल काढताच घड्याळ बंद पडते त्याप्रमाणे चैतन्याचा संपर्क तुटताच शरीर मृत होते. पंचीकरण म्हणजे शरीराशी एकरूप न होता चैतन्याशी एकरूप होणे. पंचीकरण म्हणजे स्वत:ला शरीर न मानता स्वत:ला आत्मा समजणे.

समर्थांच्या मते आपण केवळ कल्पनेने हे ८२ तत्त्वांचे गाठोडे बांधलेले आहे. माणसाने मनावर घेतले तर तो निर्धारपूर्वक हे गाठोडे झिडकारू शकतो. त्यासाठी समर्थ तत्त्वांचा निरास, तत्त्वांचा झाडा किंवा तत्त्वनिरास असे शब्द वापरतात. आपण सारेजण स्वत:ला देह समजतो हीच देहबुद्धी होय. आपण आत्मा आहोत याची अनुभूती येणे ही आत्मबुद्धी होय. पंचीकरण म्हणजे देहबुद्धीचा त्याग आणि आत्मबुद्धीचा स्वीकार. समर्थांच्या मते देहबुद्धी सोडणे एवढे सोपे नाही. संतांच्या सहवासात राहूनच देहबुद्धी सुटेल आणि आत्मज्ञान प्राप्त होईल.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: