समर्थांची करुणाष्टके

काव्याची व्याख्या करताना विल्यम् वर्डस्वर्थ याने म्हटले आहे- ‘‘Poetry is the outburst of powerful feelings of spontaneous thoughts’’ उत्कट भावनांचा अनिरुद्ध प्रवाह म्हणजे काव्य होय. समर्थांनी लिहिलेली करुणाष्टके वाचली म्हणजे विल्यम वर्डस्वर्थच्या या व्याख्येची आठवण होते. कारण करुणाष्टकांमध्ये समर्थांच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ प्रकट झाला आहे. एकार्थाने करुणाष्टके हे समर्थांचे आत्मचरित्र आहे. करुणाष्टकांचा प्रारंभ नाशिक येथे झाला असला तरी सबंध भारत प्रवासात वेळोवेळी करुणाष्टकांची निमिर्ती झाली आहे. समर्थांनी या कवितेला करुणापर स्तोत्रे असे नाव दिले. करुणाष्टक हा शब्दप्रयोग अलीकडे रूढ झाला आहे. वस्तुत: करुणाष्टकांची संख्या आठ नाही किंवा या काव्यातील श्लोक संख्यासुद्धा आठ नाही. पण काळाच्या ओघात करुणाष्टके हे नावच खूप लोकप्रिय झाले. काही करुणाष्टकांतून समर्थांची आंतरिक अवस्था प्रकट होते. नाशिकमधील वास्तव्यात समर्थांना प्रारंभी बराच त्रास सोसावा लागला असावा. लग्नमंडपातून पलायन केल्यामुळे जांबेतील कुटुंबियांचे दोर कायमचे तोडले गेले. परंतु नाशिकमध्ये आल्यावर त्यांची आबाळ व्हायला लागली. लोक त्यांना नीट माधुकरी वाढत नसत. कधीकधी अंगावर पुरेसे कपडे नसत. त्यांची ती उग्र तपश्चर्या पाहून काही लोकांना वाटत असे की, या मुलाच्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे. अशा वेळी अवघ्या बारा वर्षांच्या या मुलाचा किती मानसिक कोंडमारा झाला असेल. याची आपण कल्पना करू शकतो. समर्थांनी आपल्या मनातील भावना कशा व्यक्त केल्या आहेत ते पाहा- अन्न नाही वस्त्र नाही। सौख्य नाही जनामध्ये। आश्रयोपाहता नाही। बुद्धी दे रघुनायका। बोलता चालता ये ना। कार्यभाग कळेची ना। बहुत पिडीलो लोकी। बुद्धी दे रघुनायका।। अनेकदा समर्थांना असे वाटत असे की, आपण अनुष्ठान सोडून घरी परत जावे काय! कारण त्यांना लोक त्रास देऊ लागले म्हणजे घरातील सर्वांची आठवण व्हायची. एका करुणाष्टकात ते लिहितात- ” घरे सुंदरे सौख्य नाना परिचे। परि कोण जाणेल या अंतरिचे। मनी आठविताची हा कंठ दाटे। उदासिन हा काळ कोठे न कंठे।।” ते रामाला विचारतात- ”उठे मानसी सर्व सोडून जावे। रघुनायका काय कैसे करावे।” आपल्या मनाचा निश्चय पुन्हा पुन्हा ढळतो आहे, ही भावना त्यांनी काव्यातून प्रकट केली आहे. अर्थात ते घरी माघारी फिरले नाहीत म्हणून आपल्याला समर्थ रामदास मिळाले. पण नैराश्याचा असा कालखंड त्यांच्या जीवनातदेखील येवून गेला. नाशिकमधील वास्तव्यात त्यांची वृत्ती साधकाची होती. त्यामुळे मन कमालीचे अंतर्मुख होते. त्यांच्या चित्तात रामाखेरीज कशालाच स्थान नव्हते. ”रामचंदा तुझा वियोग। ऐसा नकोरे प्रसंग।” अशी आर्त करुणा ते रामाची भाकतात. कारण आपण रामचंदापासून दूर गेल्यामुळेच ही सारी दु:खे आपल्या वाट्याला आली आहेत, अशी त्यांची प्रामाणिक धारणा झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना लोकांमध्ये मिसळणे, सांसारिक विषयावर चर्चा करणे आवडत नसे. जसे रामकृष्ण परमहंसांना भगवंताखेरीज अन्य कोणत्याही विषयावर बोलायला आवडत नसे, त्याप्रमाणेच समर्थ आपल्या मन:स्थितीचे वर्णन करतात- मना! चाल उठी वना दुर्गमातें। न गुंते भवागारदारादिकांते।। विवेके विचारें विवंचूनि पाहीं। जनीं पाहता सर्वथा ऊरि नाही।। बहू वीट आला भवाचा न सावे। अरण्यांत देऊनियां हाक जावें।। मन तें दमावें श्रीरामीं रमावे। दिगंती फिरावें जना न स्मरावे।। सुषुप्ती अवस्थेसि भूमी निजावे। उसें रामपाद स्मरोनी धरावें।। दिशांचा महापाट तो पांघरावा। सिताकारणें साह्य वन्ही करावा।। लोकसंग्रह, समाज संघटन, सशस्त्र क्रांती हे समर्थांचे सर्व विचार भारत भ्रमणातील असून देशस्थितीचे अवलोकन केल्यावर त्यांचा आविष्कार झाला आहे. मुळातला त्यांचा पिंड भक्तीचा आणि एकांतप्रियतेचा होता. केवळ प्रभूरामचंदाच्या आदेशावरून त्यांनी नंतरचे सर्व कार्य केलेले आहे. ”राघवाचा वर। पावलो सत्वर। जनाचा उद्धार। करावया।” असे ते नंतर म्हणतात.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: