विठुरायाच्या दर्शनासाठी दहा लाख वारकरी पंढरीत

पंढरपूर, ता.२५ – “कोटी दिवाळ्या दसरे, आम्हा हेचि झाले पुरे घरोघरी ओवाळणी, विठ्ठल देखिला नयनी’ या संतवचनाप्रमाणे आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाच्या दर्शनाचे समाधान मिळविण्यासाठी १० लाख वारकरी येथे आले आहेत. 

जिकडे पाहावे तिकडे सुरेल आवाजात अभंग म्हणत तल्लीन झालेले वारकरी, विविध मठांतून रंगलेली कीर्तने असे चित्र दिसत आहे. अवघी पंढरी भक्तिमय झाली आहे.

पंढरीचा राणा, महाराष्ट्राचे आद्यदैवत, संत नामदेवांचा केशिराज, जनाबाईंचा लेकुरवाळा अर्थात आपल्या सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी त्याचा सारा गोतावळा येथे जमा झाला आहे. आषाढी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशातून देखील वारकरी येथे आले आहेत. “ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठोबा-रखुमाई, विठोबा रखुमाई’ असा जयघोष करीत असलेले वारकरी जागोजागी दिसत आहेत. “”अवघेची त्रेलोक्‍य आनंदाचे आता” असा संत एकनाथांच्या अनुभूतीचा अलौकिक अनुभव येथे गोळा झालेल्या वारकऱ्यांना येत आहे.

“चला पंढरीसी जाऊ, रखुमादेविवरा पाहू, डोळे निवतिल कान, मना तेथे समाधान” या भावनेने गावागावातून निघालेली लाखो पावले पंढरीत पोचू लागली आहेत. विविध संतांच्या पालख्या आज जसजशा शहरात प्रवेश करू लागल्या तसतशी शहरातील गर्दी क्षणाक्षणाला वाढू लागली. सारे रस्ते गर्दीने फुलून गेले. गर्दी एवढी वाढली की रस्त्यावरून चालणे देखील मुश्‍कील होत होते. तरीही एकमेकाला माऊली….माऊली असे म्हणत म्हणत वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचे पाहायला मिळत होते.

आज रात्रीपर्यंत सुमारे १० लाखाहून अधिक भाविक येथे दाखल झाले होते.

“”जेव्हा नव्हती गोदा – गंगा तेव्हा होती चंद्रभागा”- वारकऱ्यांच्या दृष्टीने श्री विठ्ठलाच्या दर्शनाप्रमाणेच चंद्रभागेतील पवित्र स्नानाला देखील महत्त्व आहे. त्यामुळे आज दशमी दिवशी चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. नदीला पुरेसे पाणी असल्याने आबालवृद्ध स्नानाचा आनंद घेत होते. स्नान झाल्यानंतर कपाळी गंध लावून श्री पुंडलिकाचे दर्शन घेऊन वारकरी आपली सुखदुःखे ऐकणाऱ्या आपल्या जीवलग सख्याला अर्थात आपल्या विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी दर्शनाच्या रांगेत उभा राहात होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या आणि रेल्वेच्या यात्रा स्पेशल गाड्यातून वारकरी येथे येत आहेत. रेल्वेने यंदा मिरज, कुर्डुवाडी प्रमाणेच दौंडपर्यंत गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. यंदा पालखी सोहळ्यांच्या सोबत पायी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. खासगी गाड्यांमधून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ दिसत आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग अपेक्षेपेक्षा जास्त लांब गेली आहे. रात्री आठ वाजता दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे रांझणी रस्त्यावर गेली होती.

दर्शनाच्या रांगेत गोंधळ
दर्शनाच्या रांगेसाठी केलेले बॅरेकेटींग तुटल्यामुळे तिथे सतत गोंधळ उडत होता. वारकरी धावत होते. त्यातच मधूनच काही जण रांगेत शिरत होते त्यामुळे वादावादी होत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास रांग पूर्ण विस्कळित झाली होती. तिथे पोलिसांची गरज असताना केवळ दोनच पोलिस रांग लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते.

तर दुसरीकडे गोपाळपूर नाक्‍याच्या समोरील पत्राशेडजवळ मोठा पोलिस बंदोबस्त बसून होता. गोंधळ थांबत नसल्याचे पाहून मग काही वारकऱ्यांनीच हातात काठ्या घेऊन रांग सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

“सकाळ’ प्रतिनिधीने गोंधळाची माहिती पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्यावर मग तिकडे पोलिस पाठवून रांग व्यवस्थित करण्यात आली.

दरम्यान वाहतूक विस्कळित होऊ नये यासाठी जादा वाहतूक पोलिस नेमलेले असताना देखील अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत होती. प्रबोधनकार ठाकरे चौकात आज दुपारी तीनच्या सुमारास वाहतूक ठप्प झाल्याने सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गर्दी आहे परंतु व्यापार नाही – व्यापाऱ्यांचे म्हणणे
यात्रा सुरू असताना पाऊस पाडू नको- व्यापाऱ्यांचे विठोबाला साकडे
यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे परंतु त्यामानाने व्यापार झालेला नाही अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी आज “सकाळ” शी बोलताना व्यक्त केल्या. घोंगडी आणि सोलापुरी चादरीचे विक्रेते अमोल उराडे आणि किशोर सादिगले म्हणाले, “”यंदा पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेपासूनच गर्दी आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही नेहमीपेक्षा जादा माल खरेदी केला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढली आहे परंतु मागच्या वर्षी एवढी देखील विक्री अजून झालेली नाही. येत्या दोन, तीन दिवसात तरी चांगला व्यापार होईल अशी अपेक्षा आहे. काल दुपारी पाऊस आल्याने बाजारपेठ एकदम रिकामी झाली.” यात्रा सुरू असेपर्यंत पाऊस पाडू नको एवढीच आमची विठोबाला प्रार्थना आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काचेच्या बांगड्या, चुडे आणि महिलांची कानातली, गळ्यातली विक्री करणारे व्यापारी दादासाहेब जगधने म्हणाले, “”यंदा सर्वत्र चांगला पाऊस झालेला असल्यामुळे आषाढीसाठी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. यंदा अधिक महिन्यात बऱ्यापैकी व्यापार झाला होता परंतु सध्या यात्रा सुुरू झालेली असली तरी तुलनेने व्यापार कमी आहे. धार्मिक ग्रंथांचे विक्रेते मिलिंद कांगे म्हणाले, “”आमची विक्री एकादशीपासून वाढत असते परंतु तरीही गेल्या दोन वर्षाच्या तुलनेने ग्रंथांची विक्री अजून तरी फारशी झालेली नाही.”

* चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची स्नानासाठी अलोट गर्दी
* श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर-रांझणी रस्त्यावर अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत
* दर्शनासाठी २८ तास
* तुलनेने गर्दी प्रचंड असूनही अपेक्षेप्रमाणे व्यापार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: