नावात काय आहे?

परवा दोन-तीन दिवसांपूर्वी मी पुण्याहून स्टेशनवर येण्यासाठी ताथवडे उद्यानाजवळ बसमध्ये चढले. सकाळची प्रसन्न वेळ. सुंदर हवा. नुकताच पाऊस पडल्याने सारी सृष्टीच चैतन्यमय आणि मोहक दिसत होती. मी खिडकीतून निरीक्षण करत होते. बहिणाबाईंची कविता मनात घोळत होती- “मन वढाय वढाय… ‘ कारण माझ्या मनातही घोळ चालला होता, “मला गाडी मिळेल का? पुढचे सगळे व्याप पूर्ण होतील का?’ बस धावत होती. एकामागोमाग बंगले पळत होते, पण बंगल्यावर विचारपूर्वक ठेवलेली नावे मात्र मी वाचत होते. खूप गंमत वाटत होती. माझं विचारचक्र सुरू झालं. बंगल्याच्या नावावरून प्रत्येक व्यक्तीची आपल्या घरातली भावनिक गुंतवणूक दिसून येत होती. समोरचा बंगला पाहिला. नाव होतं “स्थैर्य.’ मनात विचार आला, काय विचारांती ठेवलेलं नाव आहे! घरातल्या सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचं स्थैर्य लाभावं, ही त्या कुटुंबाची इच्छा असणार! आणि मग भराभर बसबरोबर पुढची नावं वाचत गेले. मनाचा गोफ प्रत्येक नावाच्या भोवती विणला जाऊ लागला. सहवास, सायली, रातराणी, विसावा. बापरे! केवढी असंख्य नावं. इच्छाआकांक्षाचे जणू धुमारेच. कुणी गुरुकृपेनं धन्य होऊन त्याचं नाव देतोय, कुणी रसिक रातराणी नाव ठेवून घराला सुगंधी करतोय. पत्नीवरच्या प्रेमानं ठेवलेलं नाव “विजया’, तर लगेच पुढे “मातृपितृकृपा’ मातापित्याच्या ऋणातून मुक्त व आदर व्यक्त केलेली कल्पना. बहुतेक “विनायक’ हे नाव द्वैअर्थी दिलं असावं. पतिराजाचंही नाव असेल आणि विघ्नहर्ता गणराजालाही बोलावलंय घराच रक्षण करायला. माझी मीच अर्थ लावत गेले.

इतक्‍यात एक नाव वाचलं”मल्हार.’ हे तर केवढं गोड नाव. बहुधा या घरात सतारीचे स्वर ऐकायला येत असावेत. “विश्‍वास’ या नावाकडे तर बघतच राहावंसं वाटलं. एकदम आठवलं, मागं आम्ही शिर्डीला गेलो होतो. तिथं तर दुकानापासूुन घरापर्यंत सगळ्यांना साईबाबाची प्रेमळ नावं देऊन श्रद्धाभाव प्रगट केलेला दिसला. शेवगावला गेलो तर गजानन या नावाच्या पाट्या.

परिसर, परिस्थिती, श्रद्धा यांचा माणसाच्या आयुष्यात संगमच असतो म्हणा ना! आयुष्यात एकदाच बांधल्या जाणाऱ्या घरांना; दुकानांना हल्ली अगदी आकर्षक नावं देण्याचा कल असतानाही भारतीय संस्कृती जपलेली मराठी नावं खूप मनाला आनंद देऊन गेली. केवढा मथितार्थ या नावांनी जपलाय हे पाहून भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटला.

नावात काय आहे, असं जरी म्हटलं जात असलं तरी नावात खूप काही आहे, हे मला प्रकर्षानं जाणवलं. आणि खरंच नाव उच्चारताच माणसाचा, त्या घराचा चेहरा डोळ्यांपुढे हमखास येतो. कारण माणसांचं नावांवरही प्रेम असतंच, हे कबूल केलंच पाहिजे.

Advertisements

~ by manatala on जुलै 25, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: