सकाळ वृत्तसेवा :मुंबईतील पहिली हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू

मुंबई - हृदयरोग्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुंबईतील पहिल्या हवाई रुग्णवाहिका सेवेचे उद्‌घाटन आज राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते करण्यात आले. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट व तुलसियानी ट्रस्ट यांच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली असून, एशियन हार्ट हेल्पलाईन 126 126 ही सेवाही कार्यान्वित करण्यात आली आहे. 24 तास असणाऱ्या या हेल्पलाईन सेवेद्वारे हृदयरोग्यांना प्रशिक्षित डॉक्‍टरांकडून हवी ती माहिती उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. अंबुमणी रामदोस आणि चित्रपट अभिनेता अक्षयकुमार यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती. एखाद्या व्यक्तीला वेळी-अवेळी हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ रुग्णवाहिका वा आवश्‍यक ते उपचार न मिळाल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळेच हृदयरोग्याला तत्काळ रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणा असलेल्या अशा 37 रुग्णवाहिका आणि एक हवाई (हेलिकॉप्टर) रुग्णवाहिका “एशियन हार्ट’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. कुठल्याही मोबाईल वा दूरध्वनीवरून 126 126 हा क्रमांक फिरविल्यास 15 ते 30 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या रुग्णवाहिकांमध्ये डॉक्‍टर, नर्स यांच्यासह आवश्‍यक त्या औषधांची सोय करून देण्यात आली आहे. मुंबई वा विशेषतः मुंबईबाहेरील रुग्णांना तत्काळ हवाई रुग्णवाहिकेची सेवा हवी असल्यास तीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे; मात्र या हवाई सेवेसाठी प्रतितास 85 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. तर इतर रुग्णवाहिकांसाठी प्रतितास 1500 रुपये इतका खर्च आहे. गरीब रुग्णांसाठी दोन्ही सेवांत सवलती देण्यात येणार असून, गरीब रुग्णाला जर शासकीय वा पालिका रुग्णालयात तत्काळ दाखल करायचे असल्यास त्याला रुग्णवाहिकेची सेवा मोफत दिली जाणार आहे.

याशिवाय हृदयरोगासंबंधीची हवी ती माहिती 126 126 या क्रमांकावर मिळणार आहे. हृदयरोग हा महागडा आजार असल्याचे म्हटले जात असून, शस्त्रक्रिया वा अत्याधुनिक पद्धतीच्या उपचारांची गरज पडल्यास रुग्णाला तिथल्या तिथे 50 हजार रुपयांचे कर्ज “एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’तर्फे भारतीय स्टेट बॅंकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यासाठी नाममात्र व्याजदर आकारले जाणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेसाठी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचा “एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’चा विचार असून, हे हेलिपॅड तयार झाल्यास हेलिकॉप्टरची अर्थात हवाई रुग्णवाहिकांची संख्या 8 ते 10 अशी करण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी दिली.

रामदोस, राज्यपाल जमीर व अक्षयकुमार या सर्वांनी या सेवेचे कौतुक करीत ही सेवा हृदयरोग्यांसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हृदयरोग्यांना या सेवेमुळे तत्काळ उपचार मिळणार असल्याने हृदयरोगाच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

~ by manatala on फेब्रुवारी 24, 2009.

तुमचा अभिप्राय नोंदवा