ऋतु हिरवा… ऋतु बरवा… साद घाली मना
कुंद झालेले आकाश… भुरभुरणाऱ्या श्रावणसरी… थेट अंगावरून जाणारे धुके… थंडगार वाऱ्याचा शहारून टाकणारा स्पर्श… निथळणारे डोंगरकडे… डोंगरांच्या घळींतून खळाळणारे निर्झर… ……
पाहावे तिकडे सर्वच चमकदार हिरव्यागार रंगाचा उत्सव, असे वातावरण सध्या अकोले तालुक्यात आहे. त्यातून भटकंतीचा आनंदच विरळा. पावसाळ्यातील भटकंतीसाठी हा परिसर सर्वांना खुणावत आहे.
पावसाळी पर्यटनाला एक वेगळी चिंब अशी किनार असते. जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. अकोले तालुका हा त्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीतील दडलेली अनेक पर्यटनस्थळांनी या तालुक्याला समृद्ध केले आहे. भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड, राज्यातील शिखरांची महाराणी कळसूबाई, रतनगड यांसह तालुक्यात अनेक अपरिचित; परंतु सुंदर ठिकाणे आहेत. याशिवाय जामखेड तालुक्यातील सौताडा किंवा रामेश्वर, पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर, मायंबा, भगवानगड, पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर, वडगाव दर्या, तसेच त्या परिसरातील अनेक दऱ्या पावसाळ्यातील भटकंतीसाठी अप्रतिम आहेत. माळरानांच्या सौंदर्याचा पोतच वेगळा असतो. या दिवसांत माळराने रानफुलांनी सजतात. सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. त्यासाठी कर्जत तालुक्यातील रेहकुरी, चापडगावचा परिसर, तसेच जामखेड व पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार व वडझिरे भागातील डोंगर पठारावर जायला हवे.
स्वतःचे वाहन असेल, तर उत्तम; नाही तर भाड्याचे वाहन घेऊन एक छानसा ग्रुप करून या भागात जाण्याची मजा अनुभवावी. तेथील निसर्ग डोळ्यांत साठवावा. कॅमेरा असेल, तर ते क्षण टिपून त्यातून नंतर कायमच्या सुखद स्मृती जागवाव्यात.
अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जंगल आता अतिशय हिरवेगार अन् दाट झाले आहे. त्या भागात कोठेही गेले, तरी ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत आहेत. या निसर्गाचा आस्वाद घेण्याबरोबरच तेथील आदिवासींचे लोकजीवनही जवळून पाहण्यासारखे. कोसळणाऱ्या पावसात डोक्यावर इरलं घेऊन अनवाणी घराकडे जाणारे आदिवासी पाहिल्यावर त्यांच्या कष्टप्रद जीवनाची आपल्याला कल्पना येते.
पाचनईसारख्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासींच्या व्यथा व वेदनाही आपल्याला जाणवतात. तेथे एखाद्या झोपडीत पैसे देऊन गरमगरम जेवण बनवून घ्यावे. त्यातून त्यांना चार पैसे, तर आपल्याला गरम अन्न मिळते. थंड वातावरणात साधे गरम पिठले- भाताची चव काय असते, याचा अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा. असे अनेक अनुभव घेण्यासारखे आहेत. जोरदार पावसात न्हाऊन ताजातवाना झालेला निसर्ग आपल्याला खुणावत आहे. त्याची साद ओळखा अन् निघा…




तुमचा अभिप्राय नोंदवा