श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या गावी सुवर्णगणेशाची मूर्ती सापडल्यापासून हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या परिसराचा विकास करण्याचे शासनाने ठरविल्याने या विकासाच्या आड येणाऱ्या ४३ घरांवर बुलडोझर फिरण्याच्या वृत्ताने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. …….
पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व श्री क्षेत्र हरिहरेश्वर परिसराच्या विकासासाठी २१ कोटी रुपये मंजूर करून या कामांना सुरुवात केली आहे.
तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर येथील समुद्रात भराव करून विकासकामांची सुरुवात केल्याने तेथील शेतजमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले होते.
दिवेआगर येथे मात्र विकासकामांच्या नावाखाली ४३ घरांवर बुलडोझर फिरणार आहे. ही सर्व घरे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची असून, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही घरे तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने ही गरीब कुटुंबे धास्तावली आहेत. ही सर्व घरे शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे असले, तरी श्रीवर्धन समुद्रकिनारपट्टीच्या भागात ठिकठिकाणी अनेक अनधिकृत घरे असून, त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.




तुमचा अभिप्राय नोंदवा