सद् गुरू भेटला सदानंद
श्री ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव महाराजांची गाथा या संत वाङ्मयाबरोबर तुकोबारायांनी भागवत कथा, संतकथा व नाथांचे भावार्थ रामायण, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव, विवेकसिंधू, कबीर आदी संतांच्या वाङ्मयाचेही खूप अध्ययन केले. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांनी ग्रंथवाचन सुरू केले, त्याबरोबर गळ्यात वीणा घालून ते भजन करू लागले व प्रेमप्रीतीने प्रभूला आळवू लागले.
सुरुवातीच्या काळात तुकोबाराय प्रभूला देव म्हणून बघत होते. कालांतराने ते प्रभूकडे मायबाप, जीवीचा जिवलग, सखा म्हणून बघू लागले. महाराज ज्ञानेश्वरीचे चिंतन-मनन करू लागले, तेव्हा त्यांना असे जाणवले की, इतर ग्रंथांमध्ये जीवात्मा, जडात्मा, साक्षी आत्मा, कुटस्थ आत्मा हे शब्द व घटापटाच्या शुष्क पांडित्याची खूपच चर्चा दिसली. ते आपल्या अभंगात म्हणतात, ‘घटापटा डहुळ मन। होय शीण न करू तो।’
देवाची सेवा करावी हे त्यांना ठाऊक होते; पण ज्ञानेश्वरीतून देवच जीवाची सेवा कशी करत आहे, याची प्रचीती विशेषत्वाने उदित होऊ लागली. प्रियत्वाची परमसीमा हीच माऊली. आत्म्याची भेट याची खूणगाठ त्यांच्या मनात बांधली गेली. बाळच आईकरिता रडते असे नव्हे, तर आईसुद्धा बाळाकरिता कशी तळमळत असते, याची जाणीव ज्ञानेश्वरीतून झाली. अर्जुनाला मोह झाला, यापेक्षा देवच अर्जुनाच्या मोहात अडकला आहे हे कळून आले.
जे अमृताची वोतली। की प्रेमचि पिऊनि मातली।
म्हणौनि अर्जुन मोहें गुंतली। निघों नेणें।। ज्ञाने. अ. 5 ओ. 175
गीता ही मोक्षदायिनी आहे; पण ज्ञानेश्वरी ही प्रेमदायिनी आहे. ही भूमिका ज्ञानेश्वरीच्या अध्ययनातूनच त्यांच्या मनात प्रगट झाली. अमुक एक गोष्ट घडावी का न घडावी, ते हे विश्व ज्याच्या सत्तेने चालते तो परमात्माच एकमेव जाणतो. कर्मामध्ये जर काही कमी अधिक घडले तर त्याविषयी विचार करू नकोस.
जीवन त्या प्रभूशी एकरूप करून टाक. माळी जिकडे त्या पाण्याला घेऊन जातो तिकडे ते पाणी विनातक्रार जाते, तसे तू निराभिमानी होऊन त्या पाण्यासारखा हो व ईश्वरी सत्तेच्या ओघाशी एकरूप हो. तसेच प्रवृत्ती व निवृत्ती हे ओझे तू आपल्यावर घेऊ नकोस व निरंतर त्या परमात्म्याला भज. हा ज्ञानेश्वरीचा बोध त्यांच्या जिव्हारी ठरला म्हणून या ओवीला त्यांनी ज्ञानेश्वरीचा कळस म्हटले आहे. ‘माळीयें जेवूंतें नेलें। तेवूतें उगेचि निवांत गेले।। हा तो ज्ञानेश्वरीचा कळस। पिका आला ब्रह्मारस।।’ मोक्षापेक्षा भक्ती श्ाेष्ठ हा बोध सकळ जीवाला सनाथ करणाऱ्या नाथ महाराजांचे भागवत वाचून त्यांच्या मनामध्ये अधिकच ठसला. मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ याचे त्यांनी आपल्या अभंगात वर्णन केले आहे व भागवताचा कळस काय हेही सांगितले आहे. ‘मुक्तिवरिल गुरूभक्ति। उद्धवे मागितली प्रेमप्रीती।। हाचि भागवताचा कळस। पिका आला ब्रह्मारस।।’ अशी साधना करत करत त्यांच्या अंत:करणामध्ये जेव्हा अद्वैत बोध परिपूर्णतेला आला, तेव्हा तुकोबाराया आकाशाएवढे व्यापक होऊन अणूपेक्षाही सूक्ष्म झाले. या अद्वैत ज्ञानाच्या सिद्धांतावर उभे राहून ते म्हणतात, ‘तुज मज ऐशी परी। जैसे तरंग सागरी।।’
‘सद्गुरू भेटला सदानंद’
मानियला स्वप्नी गुरूचा उपदेश।
धरिला विश्वास दृढ नामीं।
यावरी जाली कवित्वाची स्फूतिर्।
पाय धरिले चित्तीं विठोबाचे।
ज्ञानसत्ता आपल्या सर्व षड्गुण ऐश्वर्यासहित या जगामध्ये अवतीर्ण होते, तेव्हा त्याला देवाचा अवतार म्हणावा. ते ज्ञान जेव्हा कर्मरूपाने प्रगट झालेले दिसते, तेव्हाच तो जीवाचा जन्म होय. जेव्हा तेच ज्ञान प्रेमबोधरूपाने प्रगट होते, तेव्हा तो संतांचा अथवा सद्गुरूंचा अवतार होय. देवाच्या कृपेने जीवाचा जन्म होतो आणि सद्गुरू कृपेने त्याला आकार प्राप्त होतो.
सद्गुरू कृपेशिवाय माणसाचे जीवन एका अनघड दगडासारखे आहे. माणसाच्या जीवनातील प्रत्येक कर्मामध्ये त्या-त्या अवस्थेतला गुरू भेटतोच. प्रथम आई गुरू होते, बाप गुरू होतो, शाळेतले गुरुजन आहेत, संसारामध्ये अनेक वेळा मार्गदर्शन करणारे निरनिराळे गुरू आहेत. चांगल्या मार्गाकडे नेणारे गुरू भेटतात तसेच वाममार्गाकडे नेणारे गुरू भेटतात.
मंत्रतंत्र उपदेशिती। घरोघरी गुरू आहेत आइती। शिष्यातें मेळवी सद्वस्तूतें। सद्गुरू त्याते श्रीकृष्ण मानी।। ना.भ.
म्हणून जो सत्स्वरूपाची ओळख करून देतो तो खरा सद्गुरू. अध्यात्मज्ञान आपल्यामध्ये उदित व्हायचे असेल तर सद्गुरूंची भेट ही व्हावीच लागते. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,
थोर थोरांची गती। गुरुवांचूनि नाही मूतिर्।। नारद मूनीं शिष्य भला। त्याचा गुरु ब्रह्माा झाला।। गुरु ज्ञानेश्वर दातार। त्याला निवृत्ती आधार।। तुकया सम स्वर्गा गेला। त्याचा गुरू तोचि झाला।। श्ाी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘मज हृदयीं सद्गुरू। तेणें तारिलो हा संसार पुरू।’ तुकोबारायांचे सद्गुरु त्यांच्या हृदयातून प्रगट झाले. तुकोबारायांचे गुरू व देव भिन्न नव्हते. म्हणूनच ते म्हणतात, ‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू।’




तुमचा अभिप्राय नोंदवा