वीर वारीकर पंढरीचे

आजघडीला सगळी मराठी वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि वेबसाइटही वारी कव्हर करण्यासाठी कंबर कसून उभ्या आहेत. वारीची रोज लाइव्ह वर्णनं घरबसल्या पाहता येत आहेत, वाचता येत आहेत. अनेक लेखकांनीही आपल्या लेखण्या वारीच्या वर्णनात झिजवल्या आहेत.

मात्र ज्यांच्या नावाने दिंड्या निघतात त्या माऊली ज्ञानेश्वर आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनीही तेवढ्याच तन्मयतेने वारकरयांचे आणि वारीच्या सोहळ्याचे वर्णन केले आहे. भा. प. बहिरटांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा उदय व इतिहास या प्रसि द्ध ग्रंथात या दोन संतांनी केलेले वारीचे वर्णन दिले आहे.

ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी जवळपास आठशे वर्षांपूर्वी केलेले वर्णन आजही तेवढेच चपखल आहे. वारीतली निष्ठा, श्रद्धा यांना या आठशे वर्षात कोणताही धक्का बसलेला नाही. तसाच धक्का वारीच्या बहिरंगालाही बसलेला दिसत नाही. त्याच पताका, तेच टाळ मृदुंग, त्याच तुळशीमाळा आणि तेच गोपीचंदन आजही तेवढ्याच दिमाखाने पंढरीची वाट चालते आहे.
/photo.cms?msid=2212124
ज्ञानेश्वरांनी वारीचे केलेले वर्णन असे आहे…

कुंचे पताका झळकती । टाळ मृदूंग वाजती ।
आनंदे प्रेमे गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ।।
आले हरीचे विनट । वीर वि़ठ्ठलाचे सुभट ।
भेणे झाले दिप्पट । पळती थाट दोषांचे ।।
तुळशीमाळा शोभती कंठी । गोपीचंदनाची उटी ।
सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ।।
सतत कृष्णमूर्ती सांवळी । खेळे ज्याच्या हृदयकमळी ।
शांतिक्षमा तया जवळी । जीवे भावे अनुसरल्या ।।
सहस्त्र नामाचे हतियार । शंख चक्राचे शृंगार।
अतिबळ वैराग्याचे थोर । केला मार षड्वर्गा ।।
ऐसे एकांगवीर । विठ्ठरायाचे डिंगर ।
बापरखुमादेवीरवर । जिही निर्धारी जोडला ।।

ज्ञानेदेवांचे समकालीन जिवलग नामदेवांनी विठ्ठलाच्या वाऱीकरांचे वर्णन केले आहे.
आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती ।
जालीसे विकृती पापतापा ।।
चालिले देखोनी वैष्णव जगजेठी ।
उभविती वैकुंठी गुढीया देव ।।
आले आले रे हरीचे डिंगर ।
वीर वारीकर पंढरीचे ।।
ज्यांची चरणधुळी उघळे गगन पंथे ।
ब्रह्मादिका तेथे जाली दाटी ।।
एकमेका पुढे लवविती माथे ।
म्हणती आम्हाते लागो ऱज ।।
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी ।
नाचति हरिरंगी नेणती लाजु ।।
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती ।
हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ।।
कोंदले हरिरूप देखती विश्वाकार ।
सुटले पाझर नयनकमळी ।
गुढीया रोमांकुरे सात्त्विकी दाटले ।
गर्जती विठ्ठले नामघोष ।।
मोर पिसा कुंचे भार गरूडटके ।
भाट ते नेटके मिरिवताती ।।
तेथे केशवाचे नामे तनु हे तुळिका केली ।
पायघडी घातली हरिच्या दासा ।।

~ by manatala on जुलै 27, 2007.

One Response to “वीर वारीकर पंढरीचे”

  1. Chan.

तुमचा अभिप्राय नोंदवा