उठोनि बैसे हरि कीर्तनीं

एकदा तुकाराम महाराज लोहगावला गेले. लोहगावकरांना तुकाराम महाराजांचे प्रेम असल्यामुळे कीर्तनासाठी भव्य मंडप उभारला. त्यांचा नावलौकिक जबरदस्त असल्यामुळे हजारो मंडळी कीर्तनाला उपस्थित राहिली. त्या गांवचे जोशी अत्यंत भाविक. तो तुकोबारायांच्या कीर्तनाला नित्य नियमाने उपस्थित राहत असे. त्याचा पुत्र मरणशय्येवर असतानाही जे होणार ते होणारच आपण कीर्तन का चुकवावे ? या निष्ठेने तो नेहमीप्रमाणे कीर्तनाला गेला आणि इकडे त्याच्या मुलाची प्राणज्योत मावळली.

ब्राह्माणाच्या पत्नीने आपल्या मुलाचे प्रेत कीर्तनात आणून ठेवले. ती म्हणाली , ‘ माझ्या मुलाला जिवंत करशील तरच तू खरा विष्णुभक्त. नाहीतर तू दांभिकच ठरशील. माझा पती तुझ्या भजनी लागला तेव्हापासून प्रपंचाची हानीच होत गेली. तुम्ही आपुल्या संसाराशी घातलें पाणी। तैशाचिवाणी आम्हां केलें ।। आपल्या संसाराच्या पाठोपाठ आमच्याही संसाराचे याने वाटोळे केले ‘. पक्वान्नात विष कालवावे तसे कीर्तनात विघ्न आले.

श्रोत्यांच्या रंगलेल्या वृत्तीतही विक्षेप आला , भजनात विक्षेप हेच आमचे मरण , असे म्हणत तुकोबाराय भगवंताची प्रार्थना करू लागले. सुदर्शन चक्र घेऊन तू लवकर ये आणि संकटाचे निवारण कर नाहीतर मलाच इथे प्राण ठेवावे लागतील. असा धावा करताना त्यांचे नेत्र पाझरू लागले.

धावा ऐकताच पांडुरंग प्रगट झाले आणि म्हणाले , ‘ तुझ्याजवळ जी अमृतसंजीवनी आहे , तिचा कीर्तनात उच्च उच्चार कर , म्हणजे या मुलाचे प्राण वाचतील. आणि तुकोबारायांनी सर्व श्रोत्यांसह त्या अमृतसंजीवनीचा , त्या विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. प्रत्यक्ष नादब्रह्माच तिथे प्रगट झाले. देहभान विसरून सर्वच विठ्ठलमय झाले.

या नामाचा महिमा असा की , मृत बालकाचा श्वासोच्छ्वास सुरू झाला इतकेच नाही , तर ते बालक उठोनि बैसे हरि कीर्तनीं। भजन करी सप्रेमें करूनी आता ती माऊली तुकोबारायांच्या चरणाला लागली आणि सर्वांनीच विठुरायाचा आणि तुकोबारायांचा जयजयकार सुरू केला.

तुकोबारायांचा नावलौकिक ऐकून त्यांच्या कीर्तनाच्या ठिकाणी दोन संन्याशी दाखल झाले. कीर्तनात तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला. नामच सर्व साधनांचे सार होय , नाम परात्पर परब्रह्माच होय. विवाहमंगल असो , की श्राद्धप्रसंग असो , नामस्मरण केल्याशिवाय त्याची सांगता नाही , असे निरूपण करीत त्यांनी पुन्हा विठ्ठल नामाचा गजर केला. त्या वेळी श्रोत्यांत बसलेल्या दोन्ही संन्याशांची कुश्चितपणे कुजबूज सुरू झाली , ‘ शूद मुखातून हरिनाम ऐकणे , हेही अशास्त्र आहे , म्हणून ते तेथून उठून निघाले. संन्यास स्वीकारताना मस्तकावरील शेंडी काढली खरी ; पण मनातला अहंकार मात्र दसपट वाढला होता.

शिखा टाकीली बोडोनि। परी अहंता वाढली दशगुणी ‘ – महिपती हे संन्याशी तुकोबारायांबद्दल तक्रार घेऊन थेट पुण्यात दादोजी कोंडदेव यांच्याकडे गेले आणि त्यांनी तेथे फिर्यादच केली. दंड-कमंडलू जमिनीवर टाकून , मस्तक आपटून , आकांड-ंतांडव करून त्यांनी तुकोबारायांविरुद्ध तक्रारीचे गरळ ओकावयाला सुरुवात केली. तुका शुद जातीचा आहे , त्यांनी भाविक लोकांना मोहिनी घालून , नाममहात्म्य सांगून , सर्वांना नाम घ्यायला लावले आहे. भक्तिमार्गाचा प्रसार करून , त्यांनी कर्ममार्ग बुडवला आहे.

हा जातीचा शूद , पण ब्राह्माण त्याला नमस्कार करतात. ते दादोजींना म्हणाले , ‘ तुम्ही या प्रांताचे अधिकारी आहात. तुमच्याशिवाय आता आपल्या धर्माचे रक्षण दुसरा कोणी करू शकणार नाही , तुम्ही जर हे केले नाहीत तर आम्ही इथेच प्राण देऊ. त्यांचा तो निग्रह पाहून दादोजी कोंडदेव म्हणाले , ‘ तुम्ही स्वस्थ चित्ताने येथे बसा. तुकाराम महाराजांना मी येथे बोलवून घेतो. तुमचा त्यांचा प्रतिवाद होऊ द्या. जो हरेल त्याला आम्ही शिक्षा करू.

लगेचच त्यांनी तुकोबारायांना बोलवायला दूत पाठवले. दादोजी कोंडदेवांचा निरोप मिळाल्यानंतर तुकाराम महाराज दिंडी समारंभाने दादोजी कोंडदेवांना भेटायला निघाले. त्या वेळी काही ब्राह्माण मंडळीही तिथे काय होते , ते प्रत्यक्षच पाहावे म्हणून निघाली. सर्वजण पुण्याला संगमावर येऊन थांबली व संध्याकाळी कीर्तनासाठी जमली.

तुकोबारायांचे कीर्तन आहे , हे कळताच पुण्यातील असंख्य लोक कीर्तनासाठी येऊ लागले. संगमावर जणू सैन्यच उतरले की काय , असे वातावरण दिसत होते. दादोजी कोंडदेवांनी म्हणूनच विचारले , ‘ हे सैन्य कोणाचे आहे ?’ चौकशी करताच त्यांना कळले की , तुकोबारायांच्या कीर्तनाला आणि दर्शनाला आलेल्या लोकांची ही गदीर् आहे. हे कळताच दादोजी कोंडदेवांनाही आश्चर्य वाटले व तेही तुकोबारायांच्या दर्शनाला जाण्यास निघाले.

~ by manatala on जुलै 27, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.