निसर्ग

धावपळीच्या जीवनात मानसिक व आत्मशांतीसाठी मनुष्याची पावले अनपेक्षित वळतात ती निसर्गाकडेच. विरंगुळ्याचे क्षण अनुभवण्यासाठी निसर्गाकडे सहली काढल्या जातात. निसर्गात सहल काढताना ठिकाणासाठी नियोजन अवश्‍य करावे; पण काय पाहायचे याचे नियोजन निरर्थक आहे. निसर्गाकडे जाताना मोकळ्या मनाने जावे. त्याच्याशी एकरूप व्हावे. असे झाले तर निसर्गातील शुद्धता मनातील कुरूपता नक्की घालवेल… निसर्गाविषयीचे निरूपण कवी ना. धों. महानोर यांच्या शब्दात….
आजच्या धकाधकीच्या जीवनात रोजच्या व्यापातून कुठेतरी मोकळीक मिळावी, म्हणून माणूस सहलीला जातो. सहलींद्वारे तिथल्या निसर्गाशी जोडले जाण्याची त्याची इच्छा असते. निसर्गात तो एकरूप होतो. त्याला तो नक्कीच मोकळेपणा, निवांतपणा देतो. जगण्याच्या धावपळीत बऱ्याचदा निराशा आणि कोरडेपणा येतो. यातून बाहेर पडायला माणसाला या इमारतींच्या गजबजातून बाहेर पडावे लागेल. थोडा वेळ का होईना या शहरी कोरडेपणातून बाहेर पडून डोंगर, दऱ्या, झाडे, नदी- नाले, वृक्ष, बहरलेली शेती, पीक पाणी याचे घेतलेले दर्शन माणसाला दु:खातून बाहेर काढून प्रसन्नता देते. साऱ्या जगात जर कोणी शुद्धपणाने भेटत असेल तर तो वेगवेगळ्या ठिकाणी बहरलेला निसर्गच! निसर्ग म्हणजे नुसत्या डोंगर-दऱ्या नाही. निसर्गात बघण्यासारखे, शिकण्यासारखे खूप काही असते. साधे पक्षी उडतानाही किती वेगळे दिसतात.

बगळ्यांची माळ १०-८-५-२ करीत त्रिकोणात उडत जाते. या साऱ्या हालचाली त्यातली नैसर्गिक सहजता टिपणारी दृष्टी मात्र हवी. ही दृष्टीही तो निसर्गच देतो. पण त्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हायला हवे.

गर्द झाडांच्या वनराईत समाधान लाभते. त्याच्या सावल्यांत पडून मंद हलक्‍या वाऱ्यात शरीराला, मनाला व डोळ्यांना जगातला सर्वोच्च आनंद मिळतो. वाहत्या झऱ्यांच्या झुळझुळ गाण्यात, पक्ष्यांच्या विविध स्वरांत जो आनंद आहे तो कुठल्याही वाद्यावर वाजवलेल्या स्वरांतून मिळणार नाही. ज्वारी, बाजरी, कापूस, आंबा, सीताफळ, मोसंबी यांच्या शेतांत आपण एकरूप होऊन फिरलो तर प्रत्येक ऋतूतला त्याचा “फुलोर’ सारा परिसर सुगंधित करतो. हा सुगंध त्या ठिकाणी जाऊनच उपभोगला पाहिजे. हळूहळू निसर्गाशी नाते जमले तर त्याची आणि आपली बोलीभाषा एक होऊ शकते. निसर्गाबरोबर आपण खरोखर बोलू शकतो. आपले सुख- दु:ख एक असते. भूक- तहानही एकच असते. निसर्गाशी आपण फक्त एकरूप होण्याची गरज आहे.

रानात रात्री उघडण्यावर खाट टाकून झोपलो, तर अंथरुणावरूनच रात्रीचे ताऱ्यांच्या खडीने भरलेले आकाश दिसेल. नक्षत्रांचे विविध आकार हलताना दिसतील. दिवसाचे निरभ्र आकाश गर्द निळ्या घुमटासारखे वाटेल. “हे विश्‍वचि माझे घर’ याची जाणीव या घुमटाखाली होईल.

अशा निसर्गात फिरताना नियोजन हवे का? तर हवे. कुठे जायचे याचे नियोजन करता येईल. पण तिथे काय पाहायचे याचे नियोजन मात्र करू नये. किमान निसर्गात जाताना तरी आपण मोकळ्या मनाने जावे. कारण आपण धो धो पाऊस पाहावा असे ठरवून जातो आणि हलका पाऊस अल्लाद पळतो. त्याचं रूप संपूर्ण मोतियाचे असते. त्याची उपमा कशाला नाही. म्हणूनच निसर्गात फिरताना आपण त्याच्या रूपांचे संकेत बांधू शकत नाही. स्वच्छ, निरामय मनाने त्याच्या सामोरे जाणे हेच त्याच्या जवळ जाणे असते. त्या अवस्थेचे निरूपणही करता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे

“वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती’ असे रूप न्याहाळताना “तुका म्हणे होत मनाशी संवाद आपुलाच वाद आपुल्याशी’ अशी अवस्था होते. तुकारामांनाही तेच मांडायचे आहे. निसर्गाकडे पाहताना आपणच आपले समीक्षक होतो. योगासनांमध्ये ध्यानस्थ बसण्याला महत्त्व आहे. ध्यानस्थ बसणे म्हणजे मनातील सगळे विचार काढून बंद डोळ्यांतील प्रकाशाशी एकरूप होणे. निसर्गात जातानाही हीच वृत्ती ठेवावी. उघड्या डोळ्यांनी निसर्ग बघताना मनातील जळमटे धुऊन समाधीस्थ झाल्यासारखे मोकळे व्हावे. असे झाले तरच त्या सहलीमागचा उद्देश साध्य होईल. निसर्गाशी संवाद रंगेल आणि आपल्याला अपेक्षित असणारा दोन क्षणांचा निवांतपणा लाभेल. हे क्षण तुम्हाला टवटवीत करतील. मनाला प्रसन्नता देतील. आणि हे फक्त निसर्गातच होऊ शकते. झोप झाल्यानंतर माणूस जसा नव्या उत्साहाने, ताज्या दमाने कामाला लागतो. ती प्रसन्नसता निसर्ग देऊ शकतो. त्याच्यात सामील होणे, त्याची भाषा ओळखणे महत्त्वाचे.

मग निसर्गात सहलीला जात असताना एकटेच जावे का? तर तसे नाही. सोबत हवी; पण निसर्गाचा खरा आनंद माणसांच्या गजबजाटात मिळणार नाही, हे नक्की. माझ्या दृष्टीने ते निसर्गात जाणे खरे नाही. छोट्या गटाने प्रवास केला, तर निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी असते. नुसती झाडे, डोंगर, तळी पाहणे म्हणजे निसर्गात जाणे नाही. ते अनुभवता आले पाहिजे. शेतातल्या पिकांमध्ये, झाडांमध्ये काजव्यांनी पेरलेल्या चांदण्यांमध्ये, पाण्याच्या तुषारांमधून दिसणाऱ्या सप्तरंगांमध्ये हा अनुभव मिळतो. संत सावतामाळी म्हणतात,

“कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी!’

म्हणजे विठ्ठलाकडे जाण्यासाठी लागणारी एकाग्रता, निर्मळता कांदा, मुळा, भाजीतूनही साध्य होते. ही निसर्गाची किमया आहे.

निसर्गापासून पुष्कळ काही नवे घेऊन सुंदर आयुष्य जगणार यात शंका नाही. असा हा सुंदर निसर्ग, त्यातील लवलव आणि सौंदर्य हे शब्दापलीकडंच आहे. ते सांगायला आपले शब्द तोकडे पडतात.

~ by manatala on जुलै 19, 2007.

One Response to “निसर्ग”

  1. this is one of the best writings

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.