व्यसन ऑरकुटबाजीचं….
जगाच्या अनेक देशांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या त्या इंटरनेटमुळेच. पण अशातच बासूंदीत मीठाचा खडा पडावा तसा अनेक साईटसचा उपयोग माहितीसाठी न केला जाता वेगळ्याच कारणांसाठी केला जातोय. चतूर वाचकांनी ओळखलेच असेल मी कोणत्या साईट्सकडे बोट दाखवतो आहे. सध्याच्या पिढीला ऑरकुट नावाच्या राक्षसानं अक्षरश: जादू केली आहे. झोरापिया डॉट कॉम, झुस डॉट कॉम, ऑनलाईन फ्रेंडस डॉट कॉम, अशी एकाहून अनेक असणारी ऑरकुटची राक्षरूपी भावंडं आपल्यावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहेत. अगदी कालचीच गोष्ट आहे प्रशांत दामले, आदिती शारंगधर आणि अशा अनेक मराठी कलाकारांच्या बनावट प्रोफाईल या ऑरकुट डॉट कॉम वर आल्याची माहिती एका वृत्तपत्राने प्रसिध्द केली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेली कौशंबी या तरूणीची तिच्या नौदलात असलेल्या प्रियकर मनिष ठाकूरने केलेली क्रुर हत्या आपल्याला ठाऊक आहेच. या दोघांचा संपर्क व्हायला कारणीभूत होतं ऑरकुट! पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी झालेली रेव्ह पार्टी, त्यासाठी रितसर पाठविण्यात आलेली आमंत्रणं यातही इतर संकेत स्थळांसोबत ऑरकुटचाही प्रामुख्याने वापर झाला होता. रेव्ह पार्टीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असणारे तरूण-तरूणी आणि अंमली पदार्थाचं सेवन….बीभत्स नाच या सा-याचाच समावेश होता. या पार्टीत सहभागी झालेले बहुतांश तरूण-तरूणी बीपोओत काम करणारे होते एकमेकांना ओळखतही नव्हते. दिल्लीतील एका तरूणीने तिच्या प्रियकराला नकार दिल्याने, त्याने तिचे अश्लील फोटो तयार करून ऑरकुटवर प्रसिध्द केले होते. ऑरकुटच्या कम्युनिटीवर शिवाजी महाराजांबाबत अश्लील मजकूर प्रसिध्द करण्यात आला होता त्यावरूनही बरेच वाद निर्माण झाले होते.तरी सुध्दा ऑरकुटवर प्रोफाईल असणं ही अभिमानाची बाब समजली जाते. या वेबसाईटचे अनेक फायदेही आहेत. जुन्या शाळा, अनेक लेखक, गायक, कवी, पत्रकार, उद्योजक अश्या अनेक कम्युनिटीज् आहेत. शाळेत असणारे आणि साथ सुटलेले जुने मित्र इथं भेटतात. कोण कसा आहे, कुठे आहे, काय करतो आहे याबाबत माहिती मिळते. नवे मित्रही भेटतात. पण अशा काही जमा बाजू सोडल्या तर बाकी सारी बाजू उणीच! मुळ प्रश्न आहे तो विश्वसार्हतेचा! कुठली प्रोफाईल नेमकी त्याच व्यक्तीची आहे हे कसं समजायचं?




तुमचा अभिप्राय नोंदवा